
सोलापूर, 11 जानेवारी (हिं.स.)।
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये प्रतिवर्षी प्रमाणे परंपरेनुसार मकरसंक्रांत उत्सव साजरा करण्यात येत आहे. मकरसंक्रांतीच्या उत्सवानिमित्त भोगी ला म्हणजे दिनांक 13 जानेवारी रोजी श्री रूक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा पहाटे 3.00 ते 4.30 या वेळेत करण्यात येणार आहे. माता व भगिनींना रूक्मिणी मातेस भोगी करावयाची असेल, त्यांनी मंदिरामध्ये पहाटे 4.30 ते 5.30 या वेळेत करावी. त्यादिवशी पहाटे 5.30 नंतर रूक्मिणी मातेस पोषाख व अलंकार परिधान करण्यात येतील व सकाळी 06.30 वाजेपर्यंत दर्शन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
भाविकांच्या सोईच्या दृष्टीने दिनांक 13 जानेवारी रोजी श्री विठ्ठलाकडील काकडा आरती व नित्यपूजा पहाटे 4.30 ते 5.45 या वेळेत होऊन, पदस्पर्श दर्शन पहाटे 06.00 नंतर सुरू करणेत येणार आहे. दिनांक 14 जानेवारी रोजी नेहमीच्या वेळेमध्ये मकरसंक्रांती निमित्त श्री रूक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा झालेनंतर श्री रूक्मिणी मातेस अलंकार परिधान केलेनंतर दर्शन सुरू करण्यात येणार आहे. तसेच दि.15 जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे श्री रूक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा नेहमीच्या वेळेत करण्यात येणार असून, दिनांक 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांती निमित्त जास्तीत जास्त माता व भगिनींना श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन सुलभ व्हावे, याकरीता पुरूष भाविकांनी शक्यतो मुखदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिरे समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड