
पालघर, 11 जानेवारी (हिं.स.)।
संघर्ष संघटना महाराष्ट्रच्या अध्यक्ष सुमन मानकर यांच्या नेतृत्वाखाली भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, थोर समाजसुधारक व स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सफाळे येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास नागरिक, महिला, युवक व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
१९व्या शतकात सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक अन्याय, अंधश्रद्धा व स्त्री शिक्षणावरील बंधनांना धैर्याने आव्हान दिले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, जातिभेद निवारण व सामाजिक समतेसाठी त्यांनी आयुष्यभर केलेला संघर्ष आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वैदही वाढाण (सदस्य, अनुसूचित जाती-जमाती आयोग, महाराष्ट्र), माधुरी तांडेल, निमेश मोहिते (गट शिक्षण अधिकारी, तलासरी व पालघर तालुका), अमोल पवार (एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, पालघर), सरपंच तनुजा कवळी, ज्येष्ठ समाजसेवक प्रवीण राऊत, केळवा सागरी पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी विजया गोस्वामी, सफाळे पोलीस स्टेशनच्या प्रतिनिधी धांगडा मॅडम तसेच संघर्ष संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस राजू शर्मा उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL