
पुणे, 11 जानेवारी (हिं.स.)।गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तब्बल ७०६ गुन्हेगारांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ (२) अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या विविध पोलिस ठाण्यांच्या गुन्हे अभिलेखांचा आढावा घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारहाण, शिवीगाळ, धमकी, बेकायदेशीर अग्निशस्त्र व लोखंडी शस्त्रांचा वापर, घरफोडी, मालमत्तेचे नुकसान, जबरी चोरी, दंगा, हल्ला, दरोड्याची तयारी, खंडणी, बेकायदेशीर दारू विक्री, दहशत माजवणे तसेच सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींचा यामध्ये समावेश आहे.
कारवाईनंतर सराइतांना तात्काळ या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून बाहेर पडण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहीते यांनी दिली. प्रतिबंधात्मक कारवाईच्या आदेशाचा भंग केल्यास आरोपीवर कारवाई करण्यात येणार आहे. अशाच स्वरूपाची कारवाई यापूर्वी १० जणांवर करण्यात आलेली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु