
पुणे, 11 जानेवारी (हिं.स.)। भाजप केलेल्या सर्वेक्षणानुसार आमच्या ११५ जागा निवडून येत असल्याचे समोर आले आहे. आम्हाला पूर्ण बहुमत मिळाले, पण नेत्यांनी सांगितले तर आम्हाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही सोबत घ्यावे लागेल. नेत्यांनी त्यांचा निर्णय दूरदृष्टी ठेवून घेतलेला असतो, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने १२५ उमेदवार निवडून येतील असा दावा यापूर्वी केला होता. पण गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी निवडणुकीत रंगत आणली आहे. अनेक ठिकाणी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने चांगले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीतील निकालाची उत्सुकता आहे.भाजपच्या किती जागा निवडून येणार असे विचारले असता पाटील म्हणले, ‘‘आमच्या सर्वेक्षणानुसार ११५ जागा निवडून येत आहेत. त्यात आणखी १० जागा वाढू शकतील. अजित पवारांना सोबत न घेता ही भाजपचा महापौर होऊ शकतो. पण नेत्यांनी सांगितले तर आम्हाला अजित पवारांसोबत घ्यावे लागेल. नेत्यांचा निर्णय महत्त्वाचा असतो, त्यांना खूप दूरच दिसतं या गोष्टी आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, असे पाटील यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु