
पुणे, 11 जानेवारी (हिं.स.)।
महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांचे जगणे सुलभ आणि वेगवान करणाऱ्या प्रकल्पांवर भर देणार असल्याचा निर्वाळा भारतीय जनता पक्ष –रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी दिला.
औंध येथील औंध रोड सोसायटी असोसिएशन, एम.एम. हॉटेलच्या हॉल मध्ये परिसरातील नागरिकांसोबत बैठकीच्या माध्यमातून संवाद साधताना सनी विनायक निम्हण बोलत होते. यावेळी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप–रिपाइं (आठवले) युतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह औंध रोड परिसरातील सोसायट्या मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरात बोपोडीतून एक आणि बाणेर फाट्यावरून दुसरा मेट्रो मार्ग जात आहे. या मेट्रोमार्गांचा लाभ बोपोडीतील नागरिकांना घेता यावा तसेच बाजारहाट करण्यासाठी त्यांना सहजपणे जाता यावे या दृष्टीने मेट्रो स्थानकांना जोडणारी वर्तुळाकार शटल बस सेवा सुरू करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना प्रभागातील कोणत्याही भागातून २० ते २५ मिनिटात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे शक्य होणार आहे. ही शटल सुविधा नागरिकांना वेळ आणि पैशाची बचत करणारी ठरेल, असा विश्वास निम्हण यांनी व्यक्त केला.
प्रभागातील नदी पात्राच्या परिसराची नियोजनबद्ध सुधारणा करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपल्या प्राधान्यक्रमात असल्याचेही निम्हण यांनी सांगितले. नदीपात्राचा विकास करताना पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेतली जाणारा असून हा प्रकल्प पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने साकारण्यात येईल, असा दावा त्यांनी केला.
आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, सनी निम्हण हे राजकीय परिवारातून येतात. त्यांचे वडील विनायक निम्हण यांनी या भागाचे सलग तीन वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. ते नगरसेवकही होते. सनी निम्हण हे उच्चशिक्षित असून एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे. आगामी काळात ते कालबद्ध रित्या आपली जबाबदारी आणि काम वेळेत पूर्ण करतील याची खात्री आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर