
सोलापूर, 11 जानेवारी (हिं.स.)।
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात असून उमेदवार पदयात्रा, होम टू होम प्रचारावर भर देत आहेत. प्रत्येक उमेदवारांनी लावलेल्या रिक्षा गल्लीगल्लीत प्रचार करीत आहेत. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा १३ जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजता थंडावणार आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार प्रचारासाठी उमेदवारांकडे आता काहीच दिवस आहेत.
सोलापूर महापालिकेच्या १०२ नगरसेवकांसाठी तब्बल साडेपाचशे उमेदवार मैदानात आहेत. भाजपने ७५ हून अधिक जागा निवडून येतील, असा दावा केला आहे. तर युतीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने देखील ‘महापौर आमचाच’ असा विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, माकप, मनसे या सर्वांची महाविकास आघाडीदेखील एकत्रितपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.
सध्या कोणाच्या पदयात्रेत गर्दी जास्त, कॉर्नर बैठका, सभांमध्ये किती लोक येतात, यावर सर्व पक्षाचे पदाधिकारी लक्ष ठेवून आहेत. प्रचार आता रंगात आला असून प्रचाराला चार दिवसच शिल्लक राहिले आहेत. शेवटच्या दोन दिवसांत मतदारांना विविध प्रलोभने, वस्तू, पैशांचे वाटप होऊ शकते. काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी १२ ते १७ जानेवारीपर्यंत बंदोबस्ताचे तगडे नियोजन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड