
पालघर, 11 जानेवारी (हिं.स.)।
रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने सफाळे पोलीस ठाण्याच्या वतीने केळवा रोड परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांसाठी विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ऑटो रिक्षा, बस, टॅक्सी तसेच इतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगत ते काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमात वाहन चालकांना वेगमर्यादा पाळणे, मद्यपान करून वाहन न चालवणे, दुचाकी चालकांनी हेल्मेट तर चारचाकी चालकांनी सीट बेल्टचा वापर करणे, वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी न बसवणे तसेच वाहनांचे वैध कागदपत्रे नेहमी सोबत ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच वाहतूक सिग्नलचे पालन करणे व वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर टाळण्यावर विशेष भर देण्यात आला.
रस्ता अपघात टाळण्यासाठी प्रत्येक चालकाने जबाबदारीने वाहन चालवावे, असे आवाहन उपस्थित अधिकाऱ्यांनी केले. रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करणे व नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी सांगितले. प्रवासी वाहतूक चालकांनी वाहतुकीचे नियम पाळून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ता शेळके यांच्यावतीने करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL