नायलॉन मांजावर पोलीसांचा कडक इशारा केळवा सागरी पोलीस ठाण्याची नागरिक व विक्रेत्यांना स्पष्ट सूचना
पालघर, 11 जानेवारी (हिं.स.)। नायलॉन (चायनीज) मांजामुळे नागरिक, वाहनचालक, लहान मुले तसेच पक्षी व प्राणी यांना गंभीर दुखापत होऊन जीवितहानी होण्याच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केळवा सागरी पोलीस ठाण्याने कडक सूचना जारी केल्या आहेत. सार्वजनिक
नायलॉन (चायनीज) मांजावर पोलीसांचा कडक इशारा केळवा सागरी पोलीस ठाण्याची नागरिक व विक्रेत्यांना स्पष्ट सूचना


पालघर, 11 जानेवारी (हिं.स.)।

नायलॉन (चायनीज) मांजामुळे नागरिक, वाहनचालक, लहान मुले तसेच पक्षी व प्राणी यांना गंभीर दुखापत होऊन जीवितहानी होण्याच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केळवा सागरी पोलीस ठाण्याने कडक सूचना जारी केल्या आहेत. सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक, वाहतूक व वापर पूर्णतः बंद असल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायलॉन मांजा हा अतिशय धारदार व न तुटणारा असल्याने दुचाकीस्वारांच्या गळ्याला गंभीर इजा होण्याचे प्रकार घडतात. तसेच पक्षी व प्राणी यांचे प्राण धोक्यात येतात. त्यामुळे या मांजावर बंदी घालण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

नायलॉन किंवा चायनीज मांजाची कोणतीही विक्री, साठवणूक अथवा वाहतूक करू नये. दुकानदारांनी फक्त सूती व पर्यावरणपूरक मांजाच विक्रीस ठेवावा. प्रतिबंधित मांजा आढळल्यास तो जप्त करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. ऑनलाईन किंवा गुप्त पद्धतीने विक्री करणाऱ्यांनाही सूट दिली जाणार नाही, असा इशारा पोलीसांनी दिला आहे.

नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर टाळून फक्त सुरक्षित व सूती मांजा वापरावा. रस्ते, उड्डाणपूल, विद्युत तारा, समुद्रकिनारा व गर्दीच्या ठिकाणी पतंग उडवू नये. दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेटसोबत मान संरक्षक (स्कार्फ किंवा मफलर) वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वापरलेला मांजा रस्त्यावर, झाडांवर किंवा समुद्रात टाकू नये, असेही पोलीसांनी सांगितले.

नायलॉन मांजाची विक्री किंवा वापर केल्यास भारतीय न्याय संहिता (BNS), पर्यावरण संरक्षण कायदा व स्थानिक प्रतिबंधक आदेशांनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. दोषी आढळल्यास दंडासह कारावासाची तरतूद असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांच्या जीवित सुरक्षेसाठी नायलॉन मांजाचा वापर व विक्री पूर्णतः टाळावी. सुरक्षित व पर्यावरणपूरक पतंगोत्सव साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केळवा सागरी पोलीस ठाण्याच्या सपोनि विजया गोस्वामी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande