
रत्नागिरी, 11 जानेवारी, (हिं. स.) : तोंडली-पिलवली (ता. चिपळूण) येथील आ. बा. सावंत माध्यमिक विद्यालयाने शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. विद्यालयात २ किलोवॅट क्षमतेचा शाश्वत विद्युतीकरण प्रकल्प उभारला आहे.
ॲसेंडस फर्स्ट स्पेस कंपनी, ग्रीन इंडिया इनिशिएटिव्ह, रोटरी क्लब ऑफ मुंबई बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि दी बॉम्बे मिड ईस्ट रोटरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. विद्यालयातील ५५ गरजू विद्यार्थ्यांना सौरऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांचे वाटपही करण्यात आले.
तोंडली येथे झालेल्या कार्यक्रमावेळी विद्यालयाचे चेअरमन दीपक सावंत, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुयोग गंगावणे उपस्थित होते. या वेळी 'सोलार मॅन ऑफ इंडिया' पुरस्कारप्राप्त आणि ग्रीन इंडिया इनिशिएटिव्हचे संचालक डॉ. सचिन शिगवण उपस्थित होते. या प्रसंगी सुयोग गंगावणे आणि डॉ. सचिन शिगवण यांनी सौरऊर्जेचे महत्त्व विशद केले. ग्रामीण भागातील शाळा स्वयंपूर्ण व्हाव्यात आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी हक्काचा प्रकाश मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
सरपंच मेघ सावंत व रेणुका आगरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करतानाच, ग्रामीण विकासासाठी हा प्रकल्प दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. मुख्याध्यापक सुखदेव मस्के यांनी प्रास्ताविक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी