
ठाणे, 11 जानेवारी (हिं.स.)।
ठाण्यातुन क्लस्टर हद्दपार करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरांची निर्मिती करण्याचा संकल्प काँग्रेस (आय) ने केला आहे. ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुक - 2026 साठी ठाणे शहर काँग्रेसने आपला १५ कलमी जाहिरनामा शनिवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते प्रकाशित केला. या जाहिरनाम्या द्वारे काँग्रेसने एक प्रकारे सर्वसामान्य ठाणेकरांना साद घातली आहे. यावेळी बोलताना सपकाळ यांनी, सत्ताधारी पक्षांवर चौफेर टीका करीत महायुतीच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढले.
ठाणे महापालिका निवडणुक - 2026 च्या निमित्ताने प्रकाशित केलेल्या जाहिरनाम्यात काँग्रेसने १५ कलमी उपक्रमांची घोषणा केली आहे. यात खड्डे विरहीत रस्त्यांची सुरक्षित सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, दिवाबत्ती, नियोजनपूर्वक पाठीपुरवठा करताना पाण्याच्या बचती बरोबरच वॉटर ऑडीट करणे, सार्वजनिक स्वच्छता, नुक्कड दवाखान्यांच्या माध्यमातुन आरोग्य सेवा, पर्यावरण संवर्धन, ज्येष्ठ नागरिक व महिलावर्गाची सुरक्षा, स्मशानभुमी - दफनभुमीत मोफत अंत्यसंस्कार, खेळासाठी मैदाने व खेळाडुंना प्राधान्य, कला - साहित्य - वाचनसंस्कृतीची जपणुक तसेच, व्यवसाय आणि स्थानिक भुमिपुत्रांकरीता रोजगार उपलब्धतेला प्रोत्साहन देण्याच्या योजनांचा समावेश केला आहे.
विशेष म्हणजे, ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामे रोखुन आरक्षित भुखंड अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्धार काँग्रेसने जाहिरनाम्यात व्यक्त केला आहे.तसेच, ठाण्यातुन क्लस्टर हद्दपार करून आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी घरांची निर्मिती करणार असल्याचे म्हटले आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कॉंग्रेसच्या सर्व अधिकृत उमेदवारां समवेत संवाद साधत अत्यंत कठीण, आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीत निवडणूक लढविणाऱ्या या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले. याप्रसंगी व्यासपिठावर ठाण्याचे प्रभारी तसेच प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बर्गे, शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, ज्येष्ठ नेते सुभाष कानडे, ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे, राजेश जाधव, प्रदीप राव, महेंद्र म्हात्रे, स्मिता वैती, रवींद्र कोळी आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- - *काँग्रेसचे खेड्याकडे चला...*
-
ठाणे महापालिका निवडणूकीच्या जाहिरनाम्यात काँग्रेसने खेड्याकडे चला... हा महात्मा गांधींचा मार्ग अवलंबला आहे. ग्रामीण धर्तीवर विहिरींचे पुर्नभरण आणि पुर्नजिवीत करून पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा मानस व्यक्त केला आहे. पालिका शाळांमध्ये सुतारकाम, गवंडीकाम अशा बारा बलुतेदारी कार्याच्या प्रशिक्षणासोबत शाळेत चरखा प्रशिक्षणाचा अंतर्भाव करण्याचे जाहिर केले आहे. तसेच बचत गटांच्या माध्यमातुनही ज्येष्ठांना चरखा चालविण्यास शिकवले जाणार आहे. प्राचीन मुलभुत आयुर्वेदाचेही शिक्षण पालिका शाळेतुन दिले जाणार असल्याचे काँग्रेसने नमुद केले आहे.
- - *महायुतीला भ्रष्ट मार्गाने मिळतो पैसा*
ठाणे व उर्वरित महाराष्ट्रात सद्यस्थितीत जनतेला भेडसावणाऱ्या मुद्द्यांवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सडेतोड भाष्य केले. महायुतीतील तिन्ही पक्षांकडे मोठ्या प्रमाणावर पैसा असुन हा पैसा चार मार्गाने उकळला जात आहे. यात समृद्धी महामार्ग सारख्या शासकीय योजनांच्या भ्रष्टाचारातून पैसा, बदल्यांमधुन पैसे उकळणारे देवाभाऊ, भूमाफियांमार्फत शासकीय जमिनी विकून पैसे कमावले, एकनाथ शिंदे भावाच्या माध्यमातून अंमलीपदार्थ सारख्या अवैध धंद्यातुन पैसा कमवित असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर