सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आर्थिक समिधेच्या यज्ञात योगदान द्या - सुमेधाताई चिथडे
ठाणे, 11 जानेवारी (हिं.स.)। देशाच्या सीमेवर तैनात सैनिक प्रतिकुल परिस्थितीतही प्रथम राष्ट्र हा विचार घेऊन जगतात. ह्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आर्थिक समिधेच्या यज्ञात सर्वानी योगदान द्यायला हवे. असे आवाहन गेली २६ वर्षे सियाचिन आणि
Thane


ठाणे, 11 जानेवारी (हिं.स.)।

देशाच्या सीमेवर तैनात सैनिक प्रतिकुल परिस्थितीतही प्रथम राष्ट्र हा विचार घेऊन जगतात. ह्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आर्थिक समिधेच्या यज्ञात सर्वानी योगदान द्यायला हवे. असे आवाहन गेली २६ वर्षे सियाचिन आणि कूपवाडा येथे भारतीय लष्करासाठी प्राणवायू युनिट उभारणाऱ्या ‘सिर्फ’ (सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन) संस्थेच्या सुमेधाताई चिथडे यांनी केले. त्यांच्या ह्या आवाहनानंतर पहिली पावन भिक्षा आमदार संजय केळकर यांनी देताच श्रोत्यांनीही या समिधा यज्ञात भरभरून योगदान दिले.

ठाण्याच्या नौपाडा येथील सरस्वती क्रिडा संकुलाच्या मैदानात आयोजित ४० व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत राष्ट्रायस्वाहाः इदं न मम ,या अंतर्गत भारतीय सैन्य आणि त्यांचे राष्ट्राप्रती योगदान या विषयावरील तिसरे पुष्प शनिवारी सुमेधा चिथडे यांनी गुंफले. या प्रसंगी, व्यासपीठावर आमदार संजय केळकर, व्याख्यानमालेच्या या सत्राचे अध्यक्ष कॅप्टन चंद्रशेखर वारळकर आणि माधुरी ताम्हाणे उपस्थित होत्या. तर, श्रोत्यांमध्ये, माजी उपमहापौर सुभाष काळे, व्याख्यानमाला समितीचे सचिव शरद पुरोहीत आदीसह अनेकजण उपस्थित होते. यावेळी सुमेधाताई चिथडे यांच्या कार्यात साह्य करणारे सीए शेखर कुलकर्णी,सीए जयदीप सहस्त्रबुद्धे आणि सीए विनोद करंदीकर यांचा आ. केळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे निवेदन व्याख्यानमाला समितीच्या माधुरी ताम्हाणे यांनी केले.

भारतमातेच्या रक्षणासाठी निःस्वार्थ सेवा करणाऱ्या भारतीय सैनिकांच्या सेवेचा सन्मान म्हणुन सिर्फ(सोल्जर्स इंडेपेंडेंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन) च्या माध्यमातून सियाचीन येथे ऑक्सिजन प्लांटची उभारणी केल्याची माहिती व्याख्यानातुन देताच उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना चेतवली. यावेळी त्यांनी सिर्फ फाउंडेशन च्या माध्यमातून सैनिकांसाठी केलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देताना ध्वनीचित्रफिती सादर केल्या. सैनिकांप्रती आपण कृतज्ञ असणं गरजेचं आहे, असं सांगत सिर्फच्या माध्यमातून ऑक्सिजन जनरेशन प्लांट आणि रिफिलिंग सेंटरचं काम कसं चालतं, हे पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे समजावले. युद्धनिती, राष्ट्रप्रेमाचे दाखले देताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महर्षी कर्वे यांची उदाहरणे दिली.

*चौकट - राष्ट्रसेवेच्या यज्ञात पावन भिक्षा टाका*

सैनिकांच्या मदतीसाठी देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने यथाशक्ती योगदान द्यावे, असे आवाहन करताना सुमेधाताईंनी थेट श्रोत्यांमध्ये जाऊन पावन भिक्षा मागितली. आजपर्यंत याच पावन भिक्षेच्या माध्यमातून कोट्यवधीचे प्रकल्प उभारून सैन्य दलाला समर्पित करण्यात आले आहेत. तेव्हा, राष्ट्रसेवेच्या कार्यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनातील आनंदाच्या प्रसंगातुन ऐच्छिक आर्थिक समिधा या पावन भिक्षेत देण्याचे प्रयत्न करावेत. असे आवाहनही त्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande