
नांदेड, 11 जानेवारी, (हिं.स.)।
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. कॉर्नर बैठका, जाहीर सभा, मतदार संपर्क आणि सततचे राजकीय दौरे यामुळे प्रमुख नेत्यांचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त झाले आहे. अशा परिस्थितीत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे नांदेड मनपा निवडणूक प्रमुख अशोक चव्हाण, राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आ. श्रीजयाताई चव्हाण यांच्यासह स्टार कॅम्पेनरांनी नांदेड येथे सुरू असलेल्या श्री सालासर भजनी मंडळाच्या वतीने आयोजित श्री शिव महापुराण कथेला उपस्थिती लावली.
हभप समाधान महाराज शर्मा यांच्या रसाळ वाणीतून श्री शिव महापुराण कथा या सर्व राजकीय नेत्यांनी काही वेळ ऐकली.
नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये आरोप प्रत्यारोपांनी गाजत असलेले राजकीय मैदान काही वेळ दूर ठेवत अध्यात्मिक मनःशांती शोधण्यासाठी या सर्व राजकीय मंडळींनी श्री शिव महापुराण कथेचा आस्वाद घेतला. निवडणूक प्रचाराच्या धावपळीतून वेळ काढत या नेत्यांनी कथाश्रवण केले. कथा समाप्तीनंतर झालेल्या आरती सोहळ्यातही त्यांनी सहभाग नोंदवला.
राजकीय व्यासपीठांवर नेहमीच राजकीय उणीदुणी, एकमेकांविषयी तीव्र भाष्य, आरोप-प्रत्यारोपाच्या मालिका आणि मतभेदांची धार पाहायला मिळते. दररोजचे राजकीय ताणतणाव व मनावर होणारे आघात विसरून ही सर्व राजकीय मंडळी ईश्वराच्या नामस्मरणामध्ये काही काळ तल्लीन झाली. या अध्यात्मिक कार्यक्रमात उपस्थित राजकीय नेते शांत, संयत आणि अंतर्मुख अवस्थेत दिसून आले.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis