
सोलापूर, 11 जानेवारी (हिं.स.)।
उजनी धरण सध्या १०० टक्के भरलेले असून धरणात ११७ टीएमसी पाणी आहे. शेतीसाठी धरणातून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन १५ जानेवारीपासून सोडले जाणार आहे. सध्या आचारसंहिता सुरू असल्याने कालवा सल्लागार समितीची बैठक होणार नाही. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने उजनीतून शेतीसाठी पहिले आवर्तन सोडण्याचे नियोजन झाले आहे.
उजनी धरणातील पाण्याचे नियोजन आठमाही आहे. धरणातील पाणी शेती व पिण्यासाठी कसे ठेवायचे, याचे नियोजन दरवर्षी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होते. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व स्थानिक आमदारांची या बैठकीला उपस्थिती असते. मात्र, सध्या महापालिकेची निवडणूक सुरू असून पुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे. आचारसंहितेत कालवा सल्लागार समितीची बैठक घेता येणार नसल्याने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता राज्याच्या जलसंपदा विभागाच्या सचिवांना पत्रव्यवहार करून त्यांच्या परवानगीने आता रब्बी हंगामातील पहिले आवर्तन शेतीसाठी सोडणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड