
नांदेड, 11 जानेवारी (हिं.स.)।
महापालिका सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाचा दिवस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेने पूर्ण जोर लावला असून वेगवेगळ्या स्तरांवर उपाययोजना तसेच व्यापक स्तरावर जनजागृतीदेखील केली जात आहे. महापालिका प्रशासनाच्या या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी, मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांनी सहभाग नोंदवण्यासाठी नांदेड शहरातील अनेक संस्था, संघटना, व्यावसायिक आस्थापना, समुहदेखील पुढे आले आहेत. मतदान केल्यानंतर बोटावरची शाई दाखवा आणि वेगवेगळ्या सवलती मिळवा, अशा आशयाच्या थेट योजनाच जाहीर करून यासर्वांनी पुढाकार घेतला आहे.
पालिका निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी दिनांक महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये इंडीयन मेडीकल असोसिएशन, क्रेडाई संघटना व हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासवेत मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची बैठक पार पडली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकवार, उपआयुक्त अजितपालसिंघ संधु, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत रिष्ठे व इतर अधिकारी उपस्थित होते.
नांदेड शहरात यंदाच्या पालिका निवडणुकीत मतदान वाढावे यासाठी विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्याकरिता प्रशासनासोबतच आता वेगवेगळ्या व्यावसायिक संघटना, संस्था, समूह हेदेखील
मतदान जनजागृती उपक्रमां मध्ये आपआपल्यापरीने हातभार लावत आहेत. मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देत विविध संघटना, संस्था आणि समूहांनी थेट सवलती जाहीर केल्या आहेत.
यंदाच्या पालिका निवडणुकीसाठी अधिकाधिक मतदारांनी मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे यासाठी विशेष प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. मतदानामध्ये मतदारांनी विक्रमी संख्येने सहभाग नोंदवावा, साप्ताहिक सुट्या व मतदानाची सुटी यांना जोडून सलग सुट्या घेऊन पर्यटनासाठी न जाता मतदानाच्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य द्यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis