
सोलापूर, 11 जानेवारी (हिं.स.)।
नान्नज अभयारण्यालगतच्या शेतकऱ्यांना वन्यजीवांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेतून अनुदान देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले आहेत.
या आदेशाची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबतचा अहवाल सात दिवसांत पाठविण्याबाबत आदेशित केले आहे. नान्नज अभयारण्यात वास्तव्यास असलेल्या रानडुकरांच्या उपद्रवामुळे नान्नजसह मार्डी, कारंबा, अकोलेकाटी, वडाळा, नरोटेवाडी, रानमसले, मोहितेवाडी, सावंतवाडी बीबीदारफळ, बाणेगाव या 11 गावांतील शेती उद्ध्वस्त होत आहे. याच्या संरक्षणाची गरज आहे.या अभयारण्यालगत असलेल्या शेतकऱ्यांना कुंपण मारण्यासाठी अनुदान देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा सुवर्णा झाडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नोव्हेंबरमध्ये वडाळा येथील कार्यक्रमात केली होती. त्यानंतर त्यांनी पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरुच ठेवला. गेल्या महिन्यात नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात जाऊन पवार यांची व वन खात्याच्या कार्यालयात जाऊन तिथे पाठपुरावा केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड