
जळगाव, 12 जानेवारी (हिं.स.) भुसावळ शहरात रामायण नगर, कंटेनर रोड परिसरात राहणाऱ्या निवृत्त आरपीएफ कर्मचाऱ्याच्या घरातून ४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. याबाबत गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या काही तासातच बाजारपेठ पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या. त्याला १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली.भुसावळ शहरातील रामायण नगरातील कृष्णाकुमार मोहन पाठक हे निवृत्त आरपीएफ कर्मचारी आहे. त्यांच्या घराच्या पोर्चमध्ये ठेवलेल्या स्टूलवर चढून चोरट्यांनी गच्चीवर प्रवेश केला. नंतर गच्चीचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. नंतर सोन्याची चैन, मंगळसूत्र, कानातील बाळ्या, टॉप्स, पेंडल, नथ, चांदीचे पायल, जोडवे, अंगठी, बजाज कंपनीची इंडक्शन शेगडी व सायकल असा मुद्देमाल चोरून नेला.त्याची एकूण किंमत सुमारे ४ लाख ३२ हजार रुपये आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ई-साक्ष (डिजिटल पुरावे) नोंदवले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला. पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक मंगेश जाधव तपास करत आहे.बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर पोलिसांनी परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पाहिले. यावेळी बाजारपेठ पोलिस ठाण्यात सायकल चोरीची तक्रार आली होती. सायकल घेऊन जाणारा एक व्यक्ती फुटेजमध्ये दिसताच पोलिसांनी शिवाजी नगरकडे मोर्चा वळवला. तेथून एक व्यक्ती सायकल घेऊन रात्री २ वाजता जाताना दिसला. त्याचे नाव कुंदन गोरेलाल कचवा (रा, मध्य प्रदेश, ह.मु. पंधरा बंगला, भुसावळ) असे आहे. त्याने चोरीची कबुली दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर