रिलायन्सच्या गीगाफॅक्टरीला फटका; चीनकडून तंत्रज्ञान नाकारल्याने प्रकल्प स्थगित
मुंबई, 12 जानेवारी (हिं.स.)। मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ग्रीन एनर्जी स्वप्नाला मोठा धक्का बसला आहे. जामनगरमध्ये उभारण्यात येत असलेल्या लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्पाला चीनकडून आवश्यक तंत्रज्ञान न मिळाल्याने कंपनीने हा प्रक
Mukesh Ambani


मुंबई, 12 जानेवारी (हिं.स.)। मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ग्रीन एनर्जी स्वप्नाला मोठा धक्का बसला आहे. जामनगरमध्ये उभारण्यात येत असलेल्या लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्पाला चीनकडून आवश्यक तंत्रज्ञान न मिळाल्याने कंपनीने हा प्रकल्प सध्या स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्सने या गीगाफॅक्टरीतून मोठ्या प्रमाणावर लिथियम-आयन सेल उत्पादन सुरू करण्याची तयारी केली होती.

यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान भागीदारीसाठी कंपनीने चीनमधील अनेक उत्पादकांशी चर्चा केली, कारण प्रगत लिथियम-आयन तंत्रज्ञानात चीनचे वर्चस्व मानले जाते. मात्र भारत-चीन दरम्यानचे तणावपूर्ण संबंध आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या देशाबाहेर हस्तांतरणावर चीनने लागू केलेले कठोर निर्बंध यामुळे या चर्चांना ब्रेक लागला आहे. तंत्रज्ञान परवाना मिळवण्यासाठी रिलायन्सची ‘झियामेन हिथियम एनर्जी स्टोरेज टेक्नॉलॉजी’सोबत चर्चा सुरू होती, परंतु त्या कंपनीने भागीदारीतून माघार घेतल्याने रिलायन्सचा बॅटरी सेल उत्पादनाचा आराखडा अडकला आहे.

रिलायन्सने 2021 मध्ये हरित ऊर्जेत 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक जाहीर करत गीगाफॅक्टरीचे लक्ष्य ठेवले होते. आता या अडथळ्यानंतर कंपनीने आपले लक्ष बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टमच्या उभारणीवर केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतःच्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणारी वीज साठवण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे लिथियम-आयन सेल निर्मितीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या थांबला असला, तरी रिलायन्सची हरित ऊर्जा क्षेत्रातील पुढील दिशा ऊर्जा साठवण क्षमतेच्या वाढीकडे वळताना दिसत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande