सर्व १४ क्लबचा आयएसएल २०२५-२६ साठी सहभाग निश्चित, एआयएफएफला लेखी आश्वासन
नवी दिल्ली, 13 जानेवारी (हिं.स.) : इंडियन सुपर लीग (आयएसएल) २०२५-२६ हंगामाभोवती असलेली दीर्घकाळापासूनची अनिश्चितता आता संपली आहे. सर्व १४ आयएसएल क्लबनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (एआयएफएफ) लेखी स्वरूपात त्यांच्या सहभागाची पुष्टी केली आहे. यामुळे
इंडियन सुपर लीग ट्रॉफी संग्रहित फोटो


नवी दिल्ली, 13 जानेवारी (हिं.स.) : इंडियन सुपर लीग (आयएसएल) २०२५-२६ हंगामाभोवती असलेली दीर्घकाळापासूनची अनिश्चितता आता संपली आहे. सर्व १४ आयएसएल क्लबनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (एआयएफएफ) लेखी स्वरूपात त्यांच्या सहभागाची पुष्टी केली आहे. यामुळे १४ फेब्रुवारीपासून प्रमुख देशांतर्गत फुटबॉल लीग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

६ जानेवारी रोजी क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी घोषणा केली की, व्यावसायिक भागीदार नसल्यामुळे रखडलेली आयएसएल १४ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि सर्व १४ क्लब सहभागी होतील. काही क्लबनी त्यावेळी केवळ तत्त्वतः सहभागी होण्यास सहमती दर्शविली होती. पण आता सर्वांनी औपचारिकपणे लेखी स्वरूपात त्यांच्या सहभागाची पुष्टी केली आहे. अनेक क्लबनी त्यांच्या घरच्या सामन्यांसाठी त्यांच्या प्रस्तावित स्टेडियमची माहिती देखील शेअर केली आहे.

यावेळी अव्वल दर्जाच्या आयएसएलमध्ये एकूण ९१ सामने खेळवले जातील, जे होम अँड अवे पद्धतीने खेळवले जातील. एआयएफएफचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी यापूर्वी सांगितले होते की लीग चालवण्यासाठी एक गव्हर्निंग कौन्सिल बोर्ड स्थापन केला जाईल, ज्याला सर्व व्यावसायिक निर्णय घेण्याचा अधिकार असेल. गव्हर्निंग कौन्सिल बोर्डाच्या स्थापनेवर चर्चा करण्यासाठी एआयएफएफ आणि क्लबमध्ये ऑनलाइन बैठक होण्याची अपेक्षा आहे. या बैठकीत २०२५-२६ हंगामासाठी प्रसारण आणि व्यावसायिक हक्कांच्या निवडीसाठी जारी करण्यात येणाऱ्या रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरएफपी) यासह इतर प्रमुख मुद्द्यांवर देखील विचार केला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande