
परभणी, 13 जानेवारी (हिं.स.)।सेलू तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने अवैध वाळू उपसा करणार्यांविरोधात धडक मोहीम सुरू असून, या मोहिमेंतर्गत मंगळवार (दि. 13) रोजी काजळी रोहिणा येथील दूधना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारे एक ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले.
तालुक्यात मागील काही दिवसांपासून महसूल विभागाकडून अवैध वाळू उपसा करणार्या वाहनांविरोधात सातत्याने धरपकड व कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, काजळी रोहिणा परिसरात दूधना नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसूल पथकास मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत काजळी रोहिणा येथील विष्णू श्रीरंग काष्टे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर (क्र. एम.एच. 28 बी.के. 8769) अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
ही कारवाई उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी दीपक गांगुर्डे यांच्या पथकाने केली. महसूल विभागाच्या या धडक मोहिमेमुळे तालुक्यातील वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis