
तेहरान, 13 जानेवारी (हिं.स.)।इराणमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनांदरम्यान आतापर्यंत २,००० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये आंदोलकांसह सुरक्षा दलांचे जवानही समाविष्ट आहेत, अशी माहिती एका इराणी अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या मृत्यूंची संख्या इराणी अधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या मान्य केली आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, संबंधित अधिकाऱ्याने दावा केला आहे की या मृत्यूंसाठी तथाकथित दहशतवादी घटक जबाबदार आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या घटनांमध्ये आंदोलकांसोबतच सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही जीव गेला आहे. मात्र मृतांपैकी नेमके किती आंदोलक आणि किती सुरक्षा दलातील कर्मचारी होते, याचा तपशील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेला नाही.
अलिकडील ही अस्थिरता खराब आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण झाली असून, गेल्या तीन वर्षांतील इराणी सरकारसमोरील ही सर्वात मोठी अंतर्गत आव्हान मानली जात आहे. हे आंदोलन अशा काळात सुरू आहे, जेव्हा गेल्या वर्षभरात इस्रायल आणि अमेरिकेकडून झालेल्या कारवायांनंतर इराणवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढलेला आहे.
१९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतर सत्तेत असलेल्या सरकारने या आंदोलनांबाबत दुहेरी धोरण स्वीकारल्याचे दिसून येते. एका बाजूला सरकार आर्थिक अडचणींमुळे झालेली आंदोलने योग्य असल्याचे मान्य करत आहे, तर दुसऱ्या बाजूला आंदोलकांविरुद्ध कठोर कारवाईही करत आहे. सरकारने या अस्थिरतेसाठी अमेरिका आणि इस्रायल यांना जबाबदार धरले आहे.
इराणी सरकारचे म्हणणे आहे की, ज्या लोकांना ते “दहशतवादी” मानते, त्यांच्याच ताब्यात आता या आंदोलनांचे नियंत्रण आहे. याआधी एका मानवाधिकार संघटनेने शेकडो मृत्यूंची पुष्टी करत हजारो लोकांना अटक करण्यात आल्याचा दावा केला होता.
अलीकडच्या काळात इंटरनेट बंदीसारख्या संचार निर्बंधांमुळे माहितीची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर अडथळलेली आहे. गेल्या एका आठवड्यात रात्रीच्या वेळी आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या संघर्षांचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. यापैकी काही व्हिडिओंची माध्यमांनी पुष्टी केली आहे. या व्हिडिओंमध्ये गोळीबार, जळती वाहने आणि इमारती स्पष्टपणे दिसत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode