
नवी दिल्ली, 14 जानेवारी (हिं.स.)। जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा व्यापार अधिशेष विक्रमी 1.19 ट्रिलियन डॉलरवर पोहोचला आहे. हा अधिशेष 2024 च्या तुलनेत तब्बल 20 टक्क्यांनी जास्त असून महागाई समायोजित केल्यानंतरही जगातील कोणत्याही देशाने नोंदवलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यापार अधिशेष ठरला आहे.
चीनच्या जनरल अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ कस्टम्सच्या ताज्या आकडेवारीनुसार केवळ डिसेंबर महिन्यातच चीनने 114.14 अब्ज डॉलरचा व्यापार अधिशेष कमावला असून हा चीनच्या इतिहासातील तिसरा सर्वात यशस्वी महिना मानला जात आहे. निर्यात आणि आयातीतील फरकाला व्यापार अधिशेष म्हणतात आणि चीनने 1993 पासून कधीही व्यापार तुटीचा सामना केलेला नाही, ही बाबही या पार्श्वभूमीवर महत्वाची मानली जाते.
अमेरिकेकडून लावण्यात आलेल्या उच्च शुल्काच्या पार्श्वभूमीवरही चिनी कंपन्यांनी निर्यातीचे मार्ग खुले ठेवले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 30 टक्के शुल्क लावल्यानंतर थेट व्यापारात घट झाली; मात्र चिनी उत्पादकांनी दक्षिण-पूर्व आशिया आणि इतर देशांमार्फत वस्तु अमेरिकेत पोहोचवण्याची युक्ती अवलंबली. त्यामुळे अमेरिकेकडे जाणाऱ्या चिनी वस्तु वेगवेगळ्या देशांच्या मार्गाने पोहोचत राहिला. दुसरीकडे चीन परदेशी वस्तूंची आयात सातत्याने कमी करत असून ‘आत्मनिर्भरते’च्या धोरणावर सरकार ठाम आहे. 2030 पर्यंतच्या पाच वर्षांच्या आर्थिक योजनेतही देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.
कमकुवत ‘रेनमिनबी’मुळे चिनी वस्तू परदेशी खरेदीदारांसाठी अधिक स्वस्त झाल्या आहेत, तर आयात चीनसाठी तुलनेने महाग झाली आहे. देशांतर्गत रिअल इस्टेट क्षेत्रातील घसरण, सामान्य कुटुंबांची घटलेली बचत आणि कमी झालेली खरेदीक्षमता यामुळे कार, सौंदर्यप्रसाधने यांसारख्या परदेशी वस्तूंची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत मागणीत आलेली घट भरून काढण्यासाठी कारखान्यांमध्ये तयार होणारा मोठ्या प्रमाणातील वस्तु निर्यातीला वळत आहे आणि त्यातून व्यापार अधिशेष झपाट्याने वाढत आहे.
दरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जीवा यांनी बीजिंगमध्ये दिलेल्या इशाऱ्यात चीन केवळ निर्यातीच्या जोरावर आपला जीडीपी वाढवू शकत नाही असे स्पष्ट केले. चीन आता इतका मोठा झाल्याने चलन मजबूत करण्यासोबतच देशांतर्गत वापर वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. अन्यथा जागतिक स्तरावर व्यापारयुद्ध निर्माण होण्याचा धोका असल्याचा इशाराही त्यांनी दिला. जपान आणि जर्मनीच्या पूर्वीच्या विक्रमांवर चीनने मोठी आघाडी घेतली असून 1993 मधील जपानचा आणि 2017 मधील जर्मनीचा व्यापार अधिशेषा पेक्षा तीन ते पाचपटीने जास्त अधिशेष चीनने नोंदवला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule