
पाच जणांवर विनयभंग व मानसिक छळाचा गुन्हा दाखल
अकोला, 14 जानेवारी (हिं.स.)। अकोला शहरातील मलकापूर परिसरात राहणाऱ्या एका नवविवाहित महिलेने सासरच्या कुटुंबीयांकडून लैंगिक व मानसिक छळ झाल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर अकोल्यातील खदान पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या पाच जणांविरोधात विनयभंगासह विविध गुन्हे दाखल केले आहेत. पीडित महिलेचे लग्न २५ मे २०२५ रोजी झाले होते, लग्नानंतर सासरी नांदत असताना सासरे सुभाष तायडे यांनी वारंवार वाईट उद्देशाने अंगाला स्पर्श करून विनयभंग केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. तसेच जेठ शुभम याने अश्लील, त्रासदायक नजर आणि अवांछित वर्तन केल्याचेही नमूद आहे. पती ऋषभ याने “वडील सांगतील तसे वागावे लागेल” असे म्हणत कोणताही विरोध न केल्याने सासऱ्यांना अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळाल्याचा आरोप आहे. लग्नानंतर पतीने शारीरिक संबंध न ठेवल्याचा दावाही पीडितेने केला आहे. सासू व जेठाणी यांनी तक्रार न करण्याचा व तडजोडीचा सल्ला दिल्याचे सांगत पीडितेने मानसिक धक्का व बदनामीच्या भीतीमुळे उशिरा तक्रार केल्याचे म्हटले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे