
जळगाव, 14 जानेवारी (हिं.स.)जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथकाकडून वाहनांची कसून चौकशी करण्यात येत असून याच दरम्यान ममुराबाद नाका येथे एका कारमध्ये २९ लाख रुपयांची रोकड, तीन किलो चांदी, आठ तोळे सोने आढळून आले. या मुद्देमालाच्या पावत्या संबंधितांकडे नसल्याने पथक व तालुका पोलिसांनी पंचनामा करून मुद्देमाल भरारी पथकाच्या ताब्यात दिला.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात येणाऱ्या वेगवेगळ्या सहा मार्गावर स्थिर सर्व्हेक्षण पथकाद्वारे वाहनांची तपासणी केली जात आहे. अशाच प्रकारे ममुराबाद तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू असताना, जळगावकडे येणाऱ्या एका कारमध्ये (क्र. एमपी ०९, सीयू २२१८) २९ लाख रुपयांची रोकड, तीन किलो चांदी, आठ तोळे सोने आढळून आले.कारमधील राकेश दामोदरदास श्रॉफ (४८), जस राकेश श्रॉफ (२१, दोघे रा. पांडुमल चौक, बऱ्हाणपूर) व चालक नवीन किशोरीलाल भावसार (३५, रा. शिकारपुरा, बऱ्हाणपूर) यांना या मुद्देमालाविषयी पथकाने विचारणी केली. त्या वेळी त्यांनी बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथून जळगाव येथील सराफा दुकानांमध्ये सोन्याची शुद्धता तपासणी करण्यासाठी व नवीन दागिने खरेदी करण्यासाठी रोकड व सोने-चांदी घेऊन जात असल्याचे सांगितले.तसेच, हा मुद्देमाल बऱ्हाणपूर येथील एका सराफ पेढीचे मालक दामोदरदास गोपालदास श्रॉफ यांच्या मालकीचा असल्याचे तिघांनी जबाबात सांगितले आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात संशयास्पद रोकड आणि सोनेचांदी सापडून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस तपासाअंती सत्य कळू शकणार आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर