
नवी दिल्ली, 14 जानेवारी (हिं.स.)। महागाईच्या आघाडीवर सामान्य नागरिकांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. किरकोळ महागाईनंतर आता डिसेंबर महिन्यात घाऊक महागाई दर वाढून 0.83 टक्क्यांवर पोहोचला आहे. अन्नधान्य, बिगर-अन्न वस्तू आणि तयार माल यांच्या किंमतींमध्ये महिन्याच्या आधारावर झालेल्या वाढीमुळे घाऊक महागाई दरात वाढ झाली आहे. हा गेल्या 8 महिन्यांतील सर्वाधिक स्तर आहे.
वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) आधारित घाऊक महागाई दर 0.83 टक्के राहिला. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये तो शून्याखाली 0.32 टक्के आणि ऑक्टोबरमध्ये शून्याखाली 1.21 टक्के होता. डिसेंबर 2024 मध्ये घाऊक महागाई दर 2.57 टक्के झाला होता.
उद्योग मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘डिसेंबर 2025 मध्ये घाऊक महागाई दरात झालेली वाढ ही प्रामुख्याने इतर उत्पादनांमध्ये, खनिज पदार्थांमध्ये, यंत्रसामग्री आणि उपकरणांच्या उत्पादनामध्ये, खाद्यपदार्थांच्या उत्पादनामध्ये आणि वस्त्रोद्योगातील किंमती वाढल्यामुळे झाली आहे.’’
आकडेवारीनुसार डिसेंबर महिन्यात अन्नधान्यांच्या किंमती 0.43 टक्क्यांनी कमी झाल्या, तर नोव्हेंबरमध्ये ही दर 4.16 टक्के होता. भाजीपाला महागाई दर डिसेंबरमध्ये 3.50 टक्क्यांनी घसरला, तर नोव्हेंबरमध्ये तो 20.23 टक्के होता.
तयार उत्पादनांच्या बाबतीत महागाई दर नोव्हेंबर 2025 मधील 1.33 टक्क्यांच्या तुलनेत डिसेंबरमध्ये 1.82 टक्के झाला. बिगर-अन्न वस्तूंच्या वर्गातील महागाई डिसेंबरमध्ये 2.95 टक्के होती, तर नोव्हेंबरमध्ये ती 2.27 टक्के होती. त्याच वेळी इंधन आणि वीज क्षेत्रातील महागाई दर डिसेंबरमध्ये 2.31 टक्के होता, तर नोव्हेंबरमध्ये तो 2.27 टक्के होता.
यापूर्वी डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर भाजीपाला, अंडी आणि डाळींसारख्या स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे तीन महिन्यांच्या उच्च स्तरावर म्हणजे 1.33 टक्क्यांवर पोहोचला होता. नोव्हेंबरमध्ये तो 0.71 टक्के होता. सप्टेंबरमध्ये तो 1.44 टक्के नोंदवला गेला होता.
लक्षात घेण्यासारखे म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) किरकोळ महागाई दरावर लक्ष ठेवते. आरबीआयने गेल्या महिन्यात चालू आर्थिक वर्ष 2025–26 साठी महागाई दराचा अंदाज आधीच्या 2.6 टक्क्यांवरून कमी करून 2 टक्के केला होता. केंद्रीय बँकेने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत धोरणात्मक व्याजदर रेपो रेटमध्ये 1.25 टक्क्यांची कपात केली आहे, त्यामुळे तो आता 5.5 टक्के झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule