
लातूर, 14 जानेवारी (हिं.स.) : डुप्लीकेट सोन्याच्या बिस्किटे व दागिन्यांच्या आधारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे 9.01 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टोळीचा मुख्य सूत्रधार संदीप दगडू जाधव हा फरार आहे.
ही टोळी बनावट सोन्याचे बिस्किटे व दागिने “खरे सोने” असल्याचा आभास निर्माण करून नागरिकांना स्वस्तात सोने मिळत असल्याचे आमिष दाखवत फसवणूक करत होती. विशेषतः महिला, वृद्ध व एकटे प्रवास करणारे नागरिक हे त्यांचे लक्ष्य होते.
13 जानेवारी रोजी गुप्त माहितीच्या आधारे गरुड चौक परिसरात सापळा रचून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून खरे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, 16 डुप्लीकेट सोन्याची बिस्किटे, डुप्लीकेट अंगठ्या तसेच कार व स्कूटी असा एकूण 9.01 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासात या टोळीचा संबंध लातूर जिल्ह्यासह धाराशिव, नांदेड व परभणी जिल्ह्यातील फसवणूक प्रकरणांशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना उदगीर शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. फरार सूत्रधाराचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लातूर पोलीस प्रशासनाने नागरिकांना अनोळखी व्यक्तीकडून स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे. संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis