
लातूर, 14 जानेवारी (हिं.स.)।लातूर जिल्ह्यातील नागरिकांचे जीवन, मालमत्ता व सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव कटिबद्ध असून, समाजात दहशत निर्माण करणाऱ्या व सतत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने एका कुख्यात टोळीविरुद्ध हद्दपारीचा आदेश पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी निर्गमित केला आहे. यामध्ये ईश्वर कांबळे, विकास कांबळे, प्रफुल गायकवाड, यांना हद्दपार करण्यात आले आहे.
या तिन्ही इसमांविरुद्ध पोलीस स्टेशन विवेकानंद चौक, लातूर येथे जबरी चोरी, दरोडा, शस्त्राचा धाक दाखवून लूटमार, धमकी देणे, टोळी बनवून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणे अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांचा गुन्हेगारी अभिलेख पाहता ते सातत्याने संघटित पद्धतीने गुन्हे करीत असून, त्यांच्या कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती, दहशत व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झालेले आहे. या टोळीविरुद्ध यापूर्वी वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई (कलम १०७ सीआरपीसी, १२९ बीएनएसएस इ.) करण्यात आली होती. मात्र, या सर्व कारवायांनंतरही त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झालेली दिसून आली नाही. उलट त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये सातत्य व तीव्रता वाढलेली आढळून आली. त्यामुळे हे स्पष्ट झाले की, सामान्य कायदेशीर कारवाया त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यास अपुऱ्या ठरत आहेत.
या टोळीविरुद्ध कोणीही उघडपणे तक्रार देण्यास धजावत नाही. कारण टोळीतील सदस्य तक्रारदारांना शारीरिक इजा, धमकी व मानसिक त्रास देतात. त्यामुळे नागरिक दहशतीखाली जीवन जगत असून, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आलेली होती. त्यांनी कायद्याचा अवमान केल्याचे व त्यांना कायद्याची भीती नसल्याचे स्पष्ट होत होते, असे पोलिसांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis