
- काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉरची करणार पायाभरणी
नवी दिल्ली, 16 जानेवारी (हिं.स.) । पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी आसाममध्ये जाणार आहेत. या दौऱ्यात 2 अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनना हिरवा झेंडा दाखवणार असून काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉरची पायाभरणी करणार आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
आसाममध्ये 2026 च्या पहिल्या सहामाहीत विधानसभा निवडणुका होणार असून, पंतप्रधानांचा हा दौरा एका महिन्याच्या आतला दुसरा दौरा ठरणार आहे. यापूर्वी 20 डिसेंबर रोजी पंतप्रधान 2 दिवसांच्या दौऱ्यावर आसाममध्ये होते. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की, पंतप्रधान 17 जानेवारीच्या सायंकाळी आसाममध्ये पोहोचतील. त्यानंतर ते शहरातील अर्जुन भोगेश्वर बरुआ क्रीडा स्टेडियममध्ये 10 हजार कलाकारांकडून सादर होणारे बोडो लोकनृत्य ‘बागुरुंबा’ पाहणार आहेत. पुढील दिवशी ते कालीआबोरकडे रवाना होतील. तेथे 6,957 कोटी रुपयांच्या खर्चाने उभारल्या जाणाऱ्या काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉरची पायाभरणी ते करणार आहेत.
याच दौऱ्यात पंतप्रधान डिब्रुगड–गोमती नगर (लखनौ) आणि कामाख्या–रोहतक या दोन अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनना हिरवा झेंडा दाखवणार असून, कालीआबोर येथे एका जाहीर सभेला संबोधित करण्याचीही शक्यता आहे.
यापूर्वी 20 डिसेंबरपासून सुरू झालेल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी गुवाहाटी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन केले होते. तसेच आसामचे पहिले मुख्यमंत्री गोपीनाथ बरदलई यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते, ज्यांच्या नावावर विमानतळाचे नामकरण करण्यात आले आहे. याशिवाय, डिब्रुगडमध्ये 10,601 कोटी रुपयांच्या खर्चाने उभारल्या जाणाऱ्या ब्राउनफिल्ड अमोनिया-युरिया प्रकल्पाची पायाभरणीही त्यांनी केली होती. त्या दौऱ्यात त्यांनी गुवाहाटी आणि नामरूप येथे जाहीर सभा घेत 2026 च्या आसाम विधानसभा निवडणुकांसाठी वातावरण निर्मिती केली होती.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी