सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर ‘वन’ची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली
मुंबई, 16 जानेवारी, (हिं.स.)। बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आपल्या मागील ‘परम सुंदरी’ चित्रपटानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या तो बहुप्रतिक्षित चित्रपट वन – फोर्स ऑफ द फॉरेस्ट च्या तयारीत व्यस्त असून, या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठ
सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर ‘वन’ची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली


मुंबई, 16 जानेवारी, (हिं.स.)। बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आपल्या मागील ‘परम सुंदरी’ चित्रपटानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या तो बहुप्रतिक्षित चित्रपट वन – फोर्स ऑफ द फॉरेस्ट च्या तयारीत व्यस्त असून, या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. हा चित्रपट मे २०२६ मध्ये प्रदर्शित होणार होता; मात्र आता त्याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘वन’च्या प्रदर्शनाची तारीख आधी १५ मे २०२६ अशी निश्चित करण्यात आली होती. मात्र आता ही तारीख पुढे ढकलण्यामागे अभिनेता अक्षय कुमारचा भूत बंगला हा चित्रपट कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले जात आहे. ‘भूत बंगला’ आधी ३ एप्रिलला प्रदर्शित होणार होता; परंतु आता तो १५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. दोन्ही चित्रपटांची निर्मिती एकता कपूर करत असल्याने, एकाच दिवशी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित करणे व्यावहारिक ठरणार नाही. त्यामुळे ‘वन’ची नवी रिलीज तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी अपेक्षा आहे.

‘वन – फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन दिपक मिश्रा आणि अरुणब कुमार करत आहेत. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्राचीन जंगलाच्या पार्श्वभूमीवर आधारित या कथेत साहस आणि थरार यांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची वास्तवता जपण्यासाठी त्याचे चित्रीकरण खऱ्या जंगलांमध्ये करण्यात येत असल्याचेही सांगितले जात आहे.

दरम्यान, सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवसानिमित्त १६ जानेवारी रोजी या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित होण्याची शक्यता असून, त्याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande