
मुंबई, 16 जानेवारी, (हिं.स.)। आमिर खान यांचा मुलगा जुनैद खान त्याच्या आगामी ‘एक दिन’ या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. चित्रपटाचा पोस्टर समोर आल्यानंतर आता त्याचा टीझरही रिलीज करण्यात आला. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून साई पल्लवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून, टीझरमध्ये जुनैदसोबत तिची केमिस्ट्री प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. सुनील पांडे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा रोमँटिक-ड्रामा चित्रपट १ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
टीझरची सुरुवात जुनैद आणि साई यांच्या व्यक्तिरेखांपासून होते. दोघेही आरशासमोर उभे राहून स्वतःकडे पाहताना दिसतात. यावेळी जुनैदचा संवाद — *“तुझं हसणं मला खूप आवडतं मीरा. तुझं मन जिंकेन की नाही, हे माहीत नाही”* — कथेतल्या भावनिक प्रवासाची झलक देतो. त्यानंतर दोघांमधील हळूहळू फुलणारे प्रेम, सुंदर क्षण दाखवले जातात; मात्र कथा एका वळणावर येऊन तुटताना दिसते.
‘एक दिन’ च्या टीझरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रेक्षक जुनैद–साई या जोडीचं कौतुक करत आहेत. मात्र काही युजर्सनी या कथेची तुलना थाई चित्रपट ‘वन डे’शी करत, ती साधर्म्याची असल्याचंही म्हटलं आहे. तरीदेखील, चित्रपटाबाबतची चर्चा वेगाने वाढत असून, रिलीजपूर्वीच त्याची लोकप्रियता सातत्याने वाढताना दिसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर