
रायगड, 17 जानेवारी (हिं.स.)।
महाड एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५.४५ वाजण्याच्या सुमारास मुंबई–गोवा महामार्गावरील सावित्री नदी पुलाजवळ नांगलवाडी गावाच्या हद्दीत पोलिसांनी गोवंशाच्या बेकायदेशीर व क्रूर वाहतुकीचा प्रकार उघडकीस आणला. या कारवाईत महिंद्रा बुलेरो पिकअप (क्र. एम.एच.-०६-बीडब्ल्यू-९३५५) मधून चार गायी अमानुषपणे वाहतूक करताना आढळून आल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक १ (रा. वरंध मोहल्ला, ता. महाड) व आरोपी क्रमांक २ (रा. किये बौद्धवाडी, ता. महाड) हे कोणताही जनावर वाहतुकीचा परवाना नसताना गायींना पिकअप वाहनाच्या हौद्यात दाटीवाटीने बांधून वाहतूक करत होते. सदर गायींना उभे राहता येणार नाही अशा स्थितीत कोंबून ठेवण्यात आले होते. त्यांना चारा-पाणी देण्यात आले नव्हते तसेच खेळती हवा, वैद्यकीय तपासणी व प्रथमोपचार साहित्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. ही वाहतूक बेकायदेशीररीत्या कत्तलीसाठी गोरेगाव, ता. माणगाव येथे नेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून आरोपी क्रमांक ३ (रा. गोरेगाव, ता. माणगाव) याच्याकडे जनावरे पोहोचविण्याचा त्यांचा उद्देश होता.
या प्रकरणी दोन आरोपींना दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.१७ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. महाड एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२५ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारणा १९९५) चे कलम ५, ९, ११, पशु क्रूरता प्रतिबंधक अधिनियम कलम ११(१), पशु वाहतूक अधिनियम कलम ४७, ४८, ५४, मोटार वाहन कायदा कलम ६६, १९२ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार श्री. चनप्पा अंबरगे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके