
रायगड, १७ जानेवारी (हिं.स.) । खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवरील मुंबई लेनवरील सावरोली टोलनाक्याजवळ पोलिसांनी मोठी कारवाई केली. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक उघडकीस आली आहे.
सदर कारवाईत सुमारे ४० लाख रुपये किंमतीचा सुगंधित पानमसाला आणि तंबाखूयुक्त गुटखा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, कंटेनर वाहन क्रमांक एम.एच.-४०-डीसी-२२६५ मधून हा प्रतिबंधित माल बेकायदेशीररीत्या वाहतूक केला जात होता. वाहन चालक आरोपी क्रमांक १ (रा. शरीफ नगर, अकोला) आणि आरोपी क्रमांक २ क्लिनर (रा. हरिहर पेठ, गाडगेनगर, अकोला) या वाहतुकीत सहभागी असल्याचे तपासात समोर आले आहे.
गुटखा मानव आरोग्यास अत्यंत हानिकारक असल्यामुळे शासनाने त्याच्या उत्पादन, साठा, वाहतूक, वितरण व विक्रीवर संपूर्ण बंदी घाललेली आहे. तरीही आरोपींनी ही बंदी मोडत मोठ्या प्रमाणावर गुटख्याची वाहतूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९/२०२६ नोंदवण्यात आला असून भारतीय दंड संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील कलम २६(२)(i), २६(२)(iv), ३(१)(ZZ)(iv) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे करीत आहेत. गुटख्याच्या पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके