
धुळे , 17 जानेवारी (हिं.स.) माजी महापौर प्रदीप कर्पे यांच्या घरावर रात्री टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली. यात लाकडी दांडक्यांसह चाकुचा वापर करीत हल्ला करण्यात आल्याने प्रदीप कर्पे यांचा नाशिक येथील नातलग तरूण गंभीर जखमी झाल्याचे समजते. दरम्यान या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात ङ्गिर्याद नोंदविण्यात आल्याची माहिती माजी महापौर प्रदीप कर्पे यांनी दिली आहे. काल मनपा निवडणुक निकालानंतर प्रदीप कर्पे यांचे चिरंजीव प्रतिक कर्पे हे विजयी मिरवणूक संपवून कुटुंबासह बाहेर गेले असतांना रात्री उशिरा घरी आले. त्यानंतर अचानक हातात काठ्या-लाठ्या, शस्त्रे घेऊन ८ ते १० जणांचा जमाव त्यांच्या घरावर चालून आला. त्यांनी घरातील महिला - पुरूषांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नाशिक येथून आलेल्या कर्पे यांच्या नातलग तरूणावर एका जणाने चाकू हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला. जखमी तरूणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आज सकाळी आझादनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, गुन्हा नोंदविण्याचे काम दुपारी उशिरापयरत सुरू होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर