
रायगड, 17 जानेवारी (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मौजे वासरंग, खोपोली (ता. खालापूर) येथे घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. तांबडी, वासरंग येथील एका महिला फिर्यादीच्या घरातून सुमारे ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना घडली होती.
फिर्यादी यांच्या घरातील किचनमध्ये खिळ्यावर अडकवून ठेवलेले दोन सोन्याच्या वाट्या असलेले, सुमारे ६ ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र अज्ञाताने लबाडीच्या हेतूने चोरून नेले होते. या घटनेनंतर खोपोली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान सदर चोरी ही वासरंग, खोपोली येथीलच विधीसंघर्षित आरोपी बालक (वय १७ वर्षे २ महिने २१ दिवस) याने स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी सखोल चौकशी करत पुरावे गोळा केले असता आरोपीचा सहभाग स्पष्ट झाला. त्यानंतर दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.५२ वाजण्याच्या सुमारास सदर विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ मधील कलम ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार श्रीमती परदेशी या करीत असून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्यासाठी तसेच आरोपीने यापूर्वी अशा स्वरूपाचे गुन्हे केले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके