
कोलकाता, 17 जानेवारी (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील मालदा येथे 3,250 कोटी रुपयांच्या अनेक रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली. याचा उद्देश पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील प्रदेशातील संचारसंपर्क मजबूत करणे तसेच विकासाला गती देणे हा आहे.
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदा टाऊन रेल्वे स्थानकाला भेट दिली. या प्रसंगी त्यांनी हावडा आणि गुवाहाटी (कामाख्या) दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या वंदे भारत स्लीपर या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. याचसोबत त्यांनी गुवाहाटी (कामाख्या) – हावडा या मार्गावरील वंदे भारत स्लीपर या रेल्वेगाडीला देखील आभासी पद्धतीने हिरवा झेंडा दाखवला. आधुनिक भारताच्या वाढत्या वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी ही पूर्णपणे वातानुकूलित असलेली वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवा सुरु केली गेली आहे. यामुळे प्रवाशांना किफायतशीर दरात विमान प्रवासासारखा अनुभव मिळू शकणार आहे. या गाडीमुळे लांब पल्ल्याचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होईल. या रेल्वेसेवेमुळे हावडा – गुवाहाटी (कामाख्या) मार्गावरील प्रवासाचा वेळ सुमारे 2.5 तासांनी कमी होणार असल्याने, धार्मिक गोष्टींसाठीचा प्रवास आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधील चार मोठ्या रेल्वे प्रकल्पांचीही पायाभरणी केली. यात बालूरघाट आणि हिली दरम्यानचा नवीन रेल्वे मार्ग, न्यू जलपायगुडी इथे नेक्स्ट जनरेशन मालवाहतूक देखभाल सुविधा , सिलिगुडी लोको शेडचे आधुनिकीकरण आणि जलपायगुडी जिल्ह्यात वंदे भारत ट्रेन देखभाल सुविधांच्या आधुनिकीकरणाचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे प्रवासी आणि मालवाहतूक विषयक क्रिया प्रक्रियांना अधिक बळकटी मिळणार आहे, बंगालच्या उत्तरेकडील भागांमधील व्यावसायिक दळणवळणीय कार्यक्षमता सुधारणार आहे, तसेच या प्रदेशात रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होणार आहेत.
पंतप्रधानांनी न्यू कूचबिहार – बामनहाट आणि न्यू कूचबिहार – बशीरहाट दरम्यानच्या रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचे काम राष्ट्राला समर्पित केले. यामुळे रेल्वे सेवा अधिक वेगवान, स्वच्छ आणि ऊर्जाक्षम होण्याला मदत होणार आहे.
पंतप्रधानांनी 4 नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांनाही आभासी पद्धतीने हिरवा झेंडा दाखवला. यात न्यू जलपायगुडी – नागरकोइल अमृत भारत एक्सप्रेस, न्यू जलपायगुडी – तिरुचिरापल्ली अमृत भारत एक्सप्रेस, अलीपुरद्वार – एसएमव्हीटी बेंगळुरू अमृत भारत एक्सप्रेस, अलीपुरद्वार – मुंबई (पनवेल) अमृत भारत एक्सप्रेस यांचा समावेश आहे. यामुळे किफायतशीर तसेच विश्वासार्ह स्वरुपातील लांब पल्ल्याची रेल्वे दळणवळणीय जोडणी वाढणार आहे. या सेवा सुविधांमुळे सामान्य नागरिक, विद्यार्थी, स्थलांतरित मजूर आणि व्यापाऱ्यांच्या प्रवासविषयक गरजांना मोठे पाठबळ लाभणार आहे, तसेच आंतरराज्यीय आर्थिक आणि सामाजिक संबंधही अधिक दृढ होऊ शकणार आहेत.
पंतप्रधानांनी एलएचबी डबे असलेल्या दोन नवीन रेल्वे सेवांनाही हिरवा झेंडा दाखवला. यात राधिकापूर – एसएमव्हीटी बेंगळुरू एक्सप्रेस, बालूरघाट – एसएमव्हीटी बेंगळुरू एक्सप्रेस या सेवांचा समावेश होता. या गाड्यांमुळे या भागातील युवा वर्ग, विद्यार्थी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञांना बेंगळुरूसारख्या महत्त्वाच्या माहिती तंत्रज्ञान आणि रोजगार केंद्रांशी थेट, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
पंतप्रधानांनी राष्ट्रीय महामार्ग-31D वरील धुपगुडी – फालाकाटा विभागाच्या पुनर्वसन आणि चौपदरीकरणाच्या कामाचीही पायाभरणी केली. हा रस्ते क्षेत्रातील एक महत्त्वाचा प्रकल्प असून, यामुळे प्रादेशिक रस्ते जोडणीत सुधारणा घडून येईल, तसेच उत्तर बंगालमधील प्रवासी आणि मालवाहतूक अधिक सुलभ होईल.
हे प्रकल्प आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मिती आणि सुधारित दळणवणीय जोडणीच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावतील. या प्रकल्पांमुळे भारताचा पूर्व भाग तसेच ईशान्य भारताला देशाच्या विकासाचे मुख्य इंजिन म्हणून अधिक बळकटी मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule