शत-प्रतिशतसाठी भाजपा जिथे गरज असेल, तिथे वापरणार आणि फेकून देणार - उद्धव ठाकरे
मुंबई, 17 जानेवारी (हिं.स.) - मी भाजपाचा एनाकोंडा असा उल्लेख याचसाठी केला. २०२९ मध्ये शत-प्रतिशतसाठी ते या लोकांना गुंडाळून टाकणार आहे. अंबरनाथमध्ये भाजपाने ते केले. जिथे गरज असेल तिथे वापरणार आणि फेकून देणार. २०२९ पर्यंत त्यांचा पक्ष संपवून टाकलेल
उद्धव ठाकरे पत्रकार परिषद


मुंबई, 17 जानेवारी (हिं.स.) - मी भाजपाचा एनाकोंडा असा उल्लेख याचसाठी केला. २०२९ मध्ये शत-प्रतिशतसाठी ते या लोकांना गुंडाळून टाकणार आहे. अंबरनाथमध्ये भाजपाने ते केले. जिथे गरज असेल तिथे वापरणार आणि फेकून देणार. २०२९ पर्यंत त्यांचा पक्ष संपवून टाकलेला असेल. काही काळ प्रतिकुल असतो, या प्रतिकुल परिस्थितीत हिंमत न हरता आम्ही लढतोय, लोकं आमच्यासोबत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईत शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ठाकरे पुढे म्हणाले, आम्ही हरलोय अशी आमची मानसिकता नाही. ज्या पद्धतीने ते निवडणूक लढले त्याला तोडीस तोड उत्तर दिले आहे. थोडाफार फरक आहे. फोडून आणलेली माणसे टिकवण्याचं टेन्शन फोडणाऱ्याला जास्त असते. त्यामुळे मला टेन्शन नाही. एकदा फुटलेले लोक कधीही फुटू शकतात. सगळेच सगळ्यांच्या संपर्कात असू शकतात. शिंदेसेना फोडून भाजपा त्यांचा महापौर बनवणार, असा दावा ठाकरेंनी केला. आमचा महापौर होईल असा आकडा दिसत नसला तरी मी किंवा शिवसैनिक कुठेही खचले नाही. त्यांच्या लेखी आमचा पराभव असला तरी आमच्या पराजयाला तेज आहे. त्यांचा विजय डागळलेला आहे. ज्यांच्या जीवावर भाजपा महापौर बनवणार आहे त्यांना लाज वाटली पाहिजे आपण काय केलंय? बाळासाहेबांचा विचार हा शिवसेनेचा महापौर बसवणे हा आहे आणि ती शिवसेना मी बघतोय. त्यामुळे गद्दारांनी विचार केला पाहिजे आपण कोणते पाप करतोय आणि हे पाप केल्यानंतर मराठी माणूस त्यांना काय म्हणणार आहे, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार केला.

दरम्यान, ईव्हीएमबाबत एका रात्रीत मत बदलू शकत नाही. आता आम्ही निकालाचा आढावा घेतोय. काही ठिकाणी अनपेक्षित निकाल लागलेत. सुरुवातीला मतदान एकतर्फी होईल असं चित्र होते. मतदान झाल्याबरोबर एक्झिट पोल यायला लागले ते कोणत्या पक्षातील कार्यालयातून दिलेत का अशी शंका आली. मतपेट्या उघडण्याआधीच टीव्हीवर आकडे यायला लागले. थोड्या वेळाने चित्र बदलत होते. यावेळी व्हीव्हीपॅट काढल्या होत्या. लोकशाहीत माझं मत कुठे जातेय हे पाहण्याचा अधिकारही हिसकावून घेतला आहे. ज्या पद्धतीने मुंबईत गुंडगिरी करून अर्ज मागे घ्यायला लावत होते. पुढच्यावेळी निवडणुकीत ईव्हीएमही ठेवणार नाहीत असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

मुंबईत आमचा महापौर व्हावा ही इच्छा होती आणि आजही आहे. आकडा आम्ही गाठू शकलो नाही परंतु जे काही यश शिवशक्तीने मिळवले आहे. त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला घाम फोडलाय हे नक्की..शिवसेना नामोहरम होईल यासाठी त्यांनी एकही प्रयत्न सोडला नाही. महायुतीच्या सभेत खुर्च्यांची गर्दी होती. रिकाम्या खुर्च्या मतदान कसं करू शकतात हे न उलगडणारं कोडे आहे. शिवसेना संपवण्याचा त्यांनी आटोकात प्रयत्न केला. गेली ४ वर्ष ते पैसे पेरत होते. आमचे जे निवडून आलेले नगरसेवक होते त्यातील अर्धे नगरसेवक त्यांनी गळाला लावले होते, आता ते गाळाला गेले. ४ वर्ष आमदारांना, नगरसेवक नसताना पदाधिकाऱ्यांना विकास निधीच्या नावाखाली अमाप पैसा वाटला. अगदी निवडणुकीच्या तोंडावरही प्रेशर कुकर, मिक्सर, साड्या असतील त्या वाटल्या. या पैशाचा सोर्स कुठून येतो ते माहिती नाही. या निवडणुका विचित्र पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी लढवल्या. साम, दाम, दंड भेद यापलीकडे जाऊन त्यांनी सगळ्या प्रकाराचा वापर केला. दमदाटी करून अर्ज मागे घ्यायला लावत होते. कार्यकर्त्यांना तडीपार करत होते. काही ठिकाणी दंगली भडकवण्याचा प्रयत्न केला. कल्याण डोंबिवली, ठाण्यात पैशाचे आमिष उमेदवारांना दिले. या गुंडगिरीला न घाबरता ज्या उमेदवारांनी लढत दिली आणि ज्यांनी निर्भयपणे मतदान केले हे खरोखरच लोकशाहीचे रक्षक आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच भाजपाने कागदावर शिवसेना संपवली असेल परंतु जमिनीवरची शिवसेना संपवू शकत नाही हे मतदारांनी दाखवून दिले. भाजपा कागदावर आहे पण जमिनीवर नाही. तो जमिनीवर असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते, पुसली जाणारी शाई वापरावी लागली नसती. यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता. नियम बदलावे लागले नसते. आजदेखील साधे साधे शिवसैनिक जे निवडून आलेत ते प्रचंड पैशांच्या धबधब्यासमोर निष्ठा कशी ताठमानेने लढू शकते आणि जिंकू शकते हे या शिवसैनिकांनी दाखवले आहे. मला मुंबईकरांकडून आणखी अपेक्षा नक्कीच होती. गेली २५ वर्ष जी काही आम्ही सेवा केली ती सगळ्यांसमोर ठेवली होती. कोविड काळात जे काम केले त्याची जगभरात कौतुक झाले. मुंबईकर आम्हाला अधिक आशीर्वाद देतील वाटलं होते पण झाले नाही. परंतु ठीक आहे जेवढे आशीर्वाद दिले ते भरपूर दिलेत. विशेष म्हणजे जे शिवसेनेचे गड आहेत मराठी पट्टा, इथल्या लोकांनी त्यांच्या आशीर्वादाचा हात शिवसेनेवर असाच ठेवला आहे. यापुढे आमचे लोकप्रतिनिधी मुंबई महापालिकेची तिजोरी कशी लुटली याचा भांडाफोड नक्कीच होईल. शिवसेना-मनसे आणि राष्ट्रवादी नगरसेवक हे काम करतील. आम्ही जो काही वचननामा जनतेसमोर ठेवला त्याचा पाठपुरावा करू. मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच वापरली जाईल याचे दडपण आम्ही सदैव ठेवू, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande