
रायगड, 17 जानेवारी (हिं.स.)। कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक १५ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास मौजे शिंगढोळ, ता. कर्जत येथे आर्थिक व्यवहाराच्या वादातून महिलेला धमकी देत मारहाण व विनयभंग केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला फिर्यादी व आरोपी यांच्यात जमिनीच्या आर्थिक व्यवहारातील पैशावरून वाद सुरू होता. याच वादातून दोन दिवसांपूर्वी कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या पतीचे नाव वापरून बदनामीकारक आशय असलेले बॅनर व होर्डिंग शिंगढोळ–कशेळे परिसरात लावले होते. सदर बॅनरचे छायाचित्र आरोपी क्रमांक १ याने आपल्या मोबाइल व्हॉटसअॅप स्टेटसवर ठेवले होते. त्यानंतर फिर्यादी यांच्या पतीने संबंधित बॅनर व होर्डिंग काढून टाकले.
याचा राग मनात धरून आरोपी क्रमांक १ व २ यांनी संगनमत करून फिर्यादी यांच्या घरासमोर जाऊन त्यांच्या पतीबाबत चौकशी केली. पती घरी नसल्याचे सांगताच आरोपींनी “आमचे पैसे दे, अन्यथा तुझ्या व तुझ्या नवऱ्याचे हातपाय तोडून टाकू” अशी धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना हाताबुक्क्याने मारहाण केली. तसेच आरोपी क्रमांक १ याने फिर्यादी यांच्या छातीवर दोन्ही हात ठेवून त्यांची लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप आहे.
या घटनेप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४, ३५६(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार श्री. लालासाहेब तोरवे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके