
मेेलबर्न, 18 जानेवारी (हिं.स.)तृतीय मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हने पहिला सेट गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन केले आणि गॅब्रिएल डायलोला पराभूत केले. या विजयामुळे त्याची वर्षातल्या पहिली ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजयाने सुरुवात झाली. गेल्या वर्षीचा उपविजेता झ्वेरेव्हची २४ वर्षीय कॅनेडियन डायलोविरुद्ध चांगली सुरुवात झाली नाही. पण त्याने आपल्या अनुभवाच्या आणि शक्तिशाली सर्व्हिसच्या जोरावर त्याने ६-७ (७), ६-१, ६-४, ६-२ असा विजय मिळवला. तो सलग १० व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत पोहोचला आहे.
महिला गटात सातव्या मानांकित जास्मिन पाओलिनीने अलिआक्सांद्रा सॅस्नोविचचा ६-१, ६-२ असा पराभव केला. इटालियन टेनिसपटूला सामना जिंकण्यात कोणतीही अडचण आली नाही. तिने पहिला सेट फक्त २७ मिनिटांत जिंकला आणि त्यानंतर तिचा वेग कायम ठेवला. जागतिक क्रमवारीत २० व्या क्रमांकावर असलेला इटलीचा फ्लेव्हियो कोबोली स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला मानांकित पुरुष टेनिसपटू ठरला. ब्रिटिश पात्रताधारक आर्थर फेरीने त्याला ७-६ (७), ६-४, ६-१ असे पराभूत केले.
याशिवाय, १८ व्या मानांकित फ्रान्सिस्को सेरुंडोलोने झांग झिझेनचा ६-३, ७-६ (०), ६-३ असा पराभव केला आणि ३२ व्या मानांकित कोरेंटिन मौतेटने ट्रिस्टन शुलकेटचा ६-४, ७-६ (१), ६-३ असा पराभव केला. महिला गटात, १२ व्या क्रमांकावर असलेल्या एलिना स्वितोलिनाने क्रिस्टीना बुक्साचा ६-४, ६-१ असा पराभव केला. तर मारिया सक्करीने लिओलिया जीनजिनवर ६-४, ६-२ असा विजय मिळवला. माजी विम्बल्डन विजेत्या मार्केटा वोंड्रोसोवाने खांद्याच्या दुखापतीमुळे पहिल्या फेरीच्या सामन्यापूर्वीच माघार घेतली. यामुळे पात्रता फेरीत खेळलेल्या टेलर टाउनसेंडला मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळाले, जिथे तिचा सामना हेली बॅप्टिस्टेशी झाला. दोन्ही अमेरिकन टेनिसपटूंमधील सामन्यात बॅप्टिस्टने ६-३, ६-७ (३), ६-३ असा विजय मिळवला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे