चॅटजीपीटी वर जाहिरातींची चाचणी करणार सुरू
मुंबई, 18 जानेवारी (हिं.स.)। ओपनएआय येत्या काही आठवड्यांत चॅटजीपीटी वर जाहिरातींची चाचणी सुरू करणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅटबॉट चालवण्यासाठी येणारा वाढता खर्च भागवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये स्पष्ट
ChatGPT


मुंबई, 18 जानेवारी (हिं.स.)। ओपनएआय येत्या काही आठवड्यांत चॅटजीपीटी वर जाहिरातींची चाचणी सुरू करणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅटबॉट चालवण्यासाठी येणारा वाढता खर्च भागवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, सुरुवातीच्या टप्प्यात या जाहिराती केवळ युनायटेड स्टेट्समधील मोफत आणि कमी-स्तरीय सबस्क्रिप्शन वापरकर्त्यांना दिसतील. प्रीमियम प्रो आणि एंटरप्राइझ सबस्क्राइबर्स मात्र पूर्णपणे जाहिरातमुक्त राहणार आहेत.

जनरेटिव्ह एआय चॅटबॉट्समध्ये जाहिरातींचे एकत्रीकरण हा एक संवेदनशील विषय मानला जातो, कारण जाहिरातींमुळे वापरकर्त्याच्या अनुभवात व्यत्यय येण्याची भीती कंपन्यांना असते. मात्र एआय सेवा चालवण्यासाठी लागणाऱ्या प्रचंड संगणकीय संसाधनांचा खर्च पाहता ओपनएआयला महसुलाचे नवे मार्ग शोधणे अपरिहार्य ठरत आहे. सध्या ओपनएआयच्या जवळपास एक अब्ज वापरकर्त्यांपैकी फारच कमी जण सबस्क्रिप्शनसाठी पैसे देतात, त्यामुळे कंपनीवर अतिरिक्त उत्पन्न स्रोत उभारण्याचा दबाव वाढला आहे.

2022 मध्ये चॅटजीपीटी लाँच झाल्यापासूनओपनएआयचं मूल्यांकन विविध फंडिंग फेऱ्यांमध्ये सुमारे 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचलं आहे. तरीही कंपनी चॅटजीपीटी चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोख खर्च करत आहे. हा खर्च प्रामुख्याने शक्तिशाली संगणकीय प्रणाली, सर्व्हर आणि डेटा प्रक्रिया यासाठी होत आहे. जाहिराती स्वीकारण्याच्या या निर्णयामुळे ओपनएआयचं व्यवसाय मॉडेल गूगल आणि मेटा यांसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या जवळ जात असल्याचं चित्र आहे, ज्यांनी मोफत सेवांच्या माध्यमातून जाहिरातींच्या जोरावर प्रचंड महसूल उभारला आहे.

ओपनएआयच्या तुलनेत गूगल, मेटा आणि ॲमेझॉनसारख्या कंपन्यांकडे एआय नवोपक्रमांसाठी मोठा जाहिरात महसूल उपलब्ध आहे. ॲमेझॉनने आपल्या शॉपिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर एक मजबूत जाहिरात व्यवसाय उभारला असून, त्यातून एआय विकासासाठी निधी मिळतो. ईमार्केटरचे विश्लेषक जेरेमी गोल्डमन यांच्या मते, जाहिराती हा जनरेटिव्ह एआयच्या शर्यतीतील अडथळा नसून उलट त्यामुळेच ओपनएआय या शर्यतीत टिकून राहू शकते. चॅटजीपीटी वर जाहिराती सुरू करणं म्हणजे ही शर्यत आता केवळ मॉडेलच्या गुणवत्तेपुरती मर्यादित राहिलेली नाही, हे ओपनएआय मान्य करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

हा बदल अशा वेळी होत आहे, जेव्हा गूगल जनरेटिव्ह एआय क्षेत्रात आघाडी घेत आहे आणि जीमेल, मॅप्स, यूट्यूबसह अनेक सेवांमध्ये एआय वैशिष्ट्यांचा विस्तार करत आहे. गूगलचा जेमिनी चॅटबॉट थेट चॅटजीपीटीशी स्पर्धा करत असून, या पार्श्वभूमीवर ओपनएआयचा जाहिरातीकडे वळण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांनी यापूर्वी अनेकदा जाहिरातींबद्दल आपली नापसंती व्यक्त केली होती. जाहिरातींमुळे चॅटजीपीटीच्या उत्तरांवर अविश्वास निर्माण होऊ शकतो, अशी त्यांची चिंता होती. मात्र ही भीती दूर करण्यासाठी ओपनएआयने स्पष्ट केले आहे की, जाहिरातींचा चॅटजीपीटीच्या उत्तरांवर कोणताही परिणाम होणार नाही. वापरकर्त्यांची संभाषणे जाहिरातदारांपासून पूर्णपणे खाजगी ठेवली जातील आणि जाहिराती नेहमी वेगळ्या व स्पष्टपणे चिन्हांकित केलेल्या असतील.

महसुलापेक्षा विश्वासाला प्राधान्य देण्याची भूमिका ओपनएआयच्या ॲप्लिकेशन्सच्या सीईओ फिजी सिमो यांनीही अधोरेखित केली आहे. एका ब्लॉग पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, जाहिराती सादर करताना चॅटजीपीटीला सुरुवातीपासून मौल्यवान बनवणाऱ्या गोष्टींचं संरक्षण करणं अत्यावश्यक आहे. चॅटजीपीटीची उत्तरे ही जाहिरातींवर नव्हे, तर वापरकर्त्यांसाठी वस्तुनिष्ठपणे उपयुक्त असलेल्या माहितीनुसारच दिली जातील, असा विश्वास वापरकर्त्यांना वाटला पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

ओपनएआयसाठी वापरकर्त्यांचा विश्वास आणि वचनबद्धता हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. यापूर्वी कंपनीवर चॅटजीपीटीमध्ये सुरक्षिततेपेक्षा भावनिक सहभागाला प्राधान्य दिल्याचे आरोप झाले होते, ज्यामुळे काही वापरकर्त्यांना मानसिक त्रास झाल्याचंही म्हटलं जातं. अशा पार्श्वभूमीवर जाहिरातींच्या माध्यमातून महसूल वाढवताना, वापरकर्ता अनुभव आणि विश्वास टिकवणं हे ओपनएआय समोरचं सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande