
मुंबई, 18 जानेवारी, (हिं.स.)।
अर्पण ही एक जागतिक स्तरावर नावाजलेली स्वयंसेवी संस्था असून, ही संस्था बाल लैंगिक शोषणाची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी कार्यरत आहे. 'बाल सुरक्षा सप्ताह' या आपल्या सामाजिक उपक्रमानिमित्त, अर्पण संस्थेने #PocsoPakadLega हा हॅशटॅग वापरून, एका प्रभावशाली आणि राष्ट्रव्यापी मोहिमेचे आयोजन केले होते. या बाल सुरक्षा सप्ताहातील ऊर्जा, उत्साह आणि सातत्य टिकवून ठेवण्यासाठी, आता अर्पण संस्थेने आणखी एक पाऊल उचलले असून, यासाठी अर्पणच्या सर्व कर्मचार्यांनी टाटा मुंबई मॅरेथाॅन २०१६ मध्ये सहभाग घेतला.
बाल लैंगिक शोषणाच्या समस्येविषयी व्यापक जनजागृती करण्यासाठी आणि मुंबई मॅरेथाॅनमध्ये सहभागी झालेल्या हजारो धावपटूंना, त्यांना पाठिंबा देण्यासाठी जमलेल्या असंख्य समर्थकांना आणि नागरिकांना, या विषयावर खुला संवाद साधण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, अर्पणने टाटा मुंबई मॅरेथाॅनसारख्या, भारतातील सर्वश्रुत आणि प्रतिष्ठित सार्वजनिक व्यासपीठाचा सर्वोत्तम वापर केला. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून, अर्पणने बाल लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये, मुलांना न्याय मिळवून देणार्या, पाॅक्सो कायद्याच्या ('लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण अधिनियम') प्रभावी अंमलबजावणीसाठी, सामान्य नागरिकांच्या सामाजिक जबाबादारीकडे सर्वांचे लक्ष वेधले.
अर्पणतर्फे दरवर्षी आयोजित केल्या जाणार्या बाल सुरक्षा सप्ताह या सार्वजनिक जनजागृतीपर मोहिमेचा यंदाचा मध्यवर्ती विषय होता - PocsoPakadLega. अर्पण संस्थेच्या सदिच्छा दूत (गुडविल अम्बॅसेडर) आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेत्री विद्या बालन यांनी, १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरमध्ये राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाचे नेतृत्व केले आणि या उपक्रमाला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये, देशभरातून जवळपास १६ करोड ५० लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यंदाच्या बाल सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून, अर्पणने बाल लैंगिक शोषणासारखे गंभीर गुन्हे करणार्या व्यक्तींवर थेट निशाणा साधला आणि जर त्यांनी कोणत्याही मुलाला अयोग्यपणे स्पर्श केला, तर पाॅक्सो कायदा त्यांना पकडेल, अशा स्पष्ट शब्दांत, त्यांना मुलांपासून लांब राहण्याचा इशारा दिला. तसेच पॉक्सो कायद्याचे (लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण अभियान) अस्तित्व अधोरेखित करून, या कायद्याच्या उल्लंघनाचे परिणाम किती भयावह असू शकतात, याची त्यांना जाणीव करून दिली. त्यामुळे हा केवळ एक इशारा नसून, बाल लैंगिक शोषण रोखण्याच्या दिशेने उचललेलं प्रभावी पाऊल ठरेल, यात शंका नाही.
टाटा मुंबई मॅरेथाॅन २०१६ च्या ड्रीम रन स्पर्धेमध्ये अर्पणच्या संपूर्ण टीम सहभागी झाली होती. अर्पणच्या सर्व कर्मचार्यांनी एकमेकांच्या सूरात सूर मिसळत, अत्यंत अनोख्या पद्धतीने बाल सुरक्षेचा संदेश दिला आणि या स्पर्धेत आपले अस्तित्व ठळकपणे दाखवून, बाल सुरक्षा संदेशांना पुन्हा उजाळा दिला. याप्रसंगी मुलांना सुरक्षित ठेवण्याप्रती, आपली सामूहिक जबाबदारी आणि संघटित कृतीची गरज अधोरेखित करणारे फलक आणि घोषवाक्यांचा प्रभावीपणे वापर करण्यात आला. या घोषवाक्यांच्या माध्यमातून अर्पणने सर्व स्पर्धकांना आणि नागरिकांना या समस्येविरुद्ध एकत्रितपणे कृती करण्याचे आवाहन केले. कारण जेव्हा समाजातील जबाबदार आणि प्रौढ व्यक्ती या समस्येविरुद्ध
आवाज उठवतील, तेव्हाच पाॅक्सोसारख्या कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येईल आणि बाल लैंगिक शोषणासारखे गंभीर गुन्हे केलेल्या व्यक्तींना, त्यांच्या कृत्यांबद्दल दोषी ठरवता येईल, अशी अर्पणची भूमिका आहे.
यासोबतच टाटा मुंबई मॅरेथाॅनच्या सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत #PocsoPakadLega या अभियानातील मुख्य संदेश पोहोचवण्यासाठी, अर्पणने यावर्षीसुद्धा 'मोटिव्हेशनल झोन स्टेजची' उभारणी केली. या स्टेजवर बसवलेली आणि मोटारीच्या साहाय्याने फिरणारी हातकडी सर्व स्पर्धकांचे लक्ष वेधून घेत होती. मुलांना असुरक्षित करणार्या व्यक्ती पाॅक्सो कायद्याच्या कचाट्यापासून सुटू शकत नाहीत, उलट हा कायदा त्यांना आपल्या कृत्यांबद्दल दोषी ठरवून कठोर शिक्षा सुनावेल, हा संदेश जनमानसात रुजवण्यास या उपक्रमाने मदत केली. या अत्यंत लक्षवेधी आणि कायद्याला गंभीरपणे घेण्यास भाग पाडणार्या स्वयंचलित हातकडीमुळे, हजारो धावपटू, समर्थक आणि मॅरेथाॅनची मजा लुटण्यासाठी आलेल्या असंख्य सर्वसामान्य मुंबईकरांनी अर्पणच्या मोटिव्हेशनल झोन स्टेजपाशी थांबून, हा संदेश वाचला आणि बाल लैंगिक शोषणाच्या लढ्यात सामील होण्याचा निर्धार केला. याशिवाय टाटा मुंबई मॅरेथाॅनदरम्यान अर्पणने बाल लैंगिक शोषणाविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी, एक भव्य स्वाक्षरी मोहीम राबवली आणि तिथे लाखोंच्या संख्येने जमलेल्या सामान्य नागरिकांना आमंत्रित करून, त्यांना बाल सुरक्षेची प्रतिज्ञा घेण्यासाठी आणि बाल लैंगिक शोषणाच्या घटना रोखण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. तसेच या उपक्रमाने मॅरेथाॅनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना स्टेजवर जाऊन विद्या बालन यांच्या कटआऊटसोबत फोटो काढण्याची आणि हे फोटो त्यांच्या वैयक्तिक समाजमाध्यमांवर पोस्ट करून, बाल सुरक्षेचा संदेश सर्वदूर पसरवण्याची संधी दिली. टाटा मुंबई मॅरेथाॅनचे एकंदर वातावरण अत्यंत चैतन्याने भरून गेले होते. मुंबईकरांची एरव्ही कधीही न थकणारी आणि थांबणारी पावलं आज मात्र आपसूकच PocsoPakadLega च्या दिशेने वळत होती. अनेक स्पर्धकांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी अर्पणच्या अभियानाला भरभरून प्रतिसाद दिला, त्यांनी आमच्या कार्याला शुभेच्छा दिल्या, आमच्यासोबत बाल सुरक्षेच्या घोषणा दिल्या, गाणी गायली आणि मुलांना सुरक्षित ठेवण्याची प्रतिज्ञादेखील घेतली. अर्पणच्या कार्याला समर्थन देणार्यांमध्ये १८ वर्षांच्या तरुणांपासून ते अगदी ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांचादेखील समावेश होता.
गेल्या वर्षी म्हणजेच टाटा मुंबई मॅरेथाॅन २०२५ मध्ये अर्पणला सर्वोत्तम मोटिव्हेशनल झोन स्टेजसाठी दुसर्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. यावर्षीचे मोटिव्हेशनल झोन स्टेज उभारताना, अर्पणने बाल लैंगिक शोषणाच्या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधणे आणि प्रतिबंध, अशा दोन मुख्य घटकांंना प्राधान्य दिले.
अर्पणच्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा तापडिया याप्रसंगी बोलताना म्हणाल्या - बाल लैंगिक शोषणाच्या समस्येविषयी आपल्या देशवासियांनी फार पूर्वीपासून मौन धारण केले आहे. देशातील नागरिकांना या विषयावर बोलण्यास प्रवृत्त करण्यासाठी आणि शोषणकर्त्यांना त्यांच्या कृत्यांबद्दल दोषी ठरवण्यासाठी आम्ही POCSOPakadLega हे अभियान सुरू केले. बाल लैंगिक शोषणाविषयीची कुजबूज थांबवून, या विषयावर मोकळेपणाने चर्चा करण्यासाठी आणि अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करणार्या व्यक्तींवर कायद्याची वचक बसवण्यासाठी, हे अभियान उपयोगी ठरेल यात शंका नाही. टाटा मुंबई मॅरेथाॅन हे एक असे व्यासपीठ आहे, ज्याच्या माध्यमातून एका दिवशी ६०,००० पेक्षा अधिक स्पर्धकांपर्यंत पोहोचून, हा विषय मुख्य सामाजिक प्रवाहापर्यंत घेऊन जाण्याची सर्वात चांगली संधी आम्हाला मिळाली आहे. या स्पर्धेत उतरलेल्या एक जरी व्यक्तीने, बाल सुरक्षेची प्रतिज्ञा घेतली आणि त्यादृष्टीने प्रत्यक्ष कृती केली तरी त्यामुळे एका मुलाचे भविष्य पूर्णपणे बदलून जाईल, असा आम्हाला विश्वास आहे.
त्यामुळे या उपक्रमाने बाल लैंगिक शोषणाच्या प्रतिबंधाविषयी समाजात व्यापक प्रमाणावर चर्चा आणि संवाद घडवून आणणे, अधिकाधिक नागरिकांना पाॅक्सो कायद्याविषयी जागरूक बनवणे आणि शोषणकर्त्यांना त्यांच्या कृत्यांबद्दल दोषी ठरवणे, या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच या समस्येवर काम करण्यासाठी, प्रत्यक्ष मैदानात उतरून, अभिनव कल्पना लढवून, परिणामकारक रीतीने संदेश देऊन आणि सामान्य जनतेचा उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग मिळवून टाटा मुंबई मॅरेथाॅनवर आपली विशेष मोहोर उमटवली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर