
रत्नागिरी, 18 जानेवारी, (हिं. स.) : आज मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. ही भीषण वास्तवता पाहूनच आम्ही मनोरंजनाच्या माध्यमातून हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन 'क्रांतीज्योती विद्यालय' चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी सांगितले.
मराठी चित्रपटांच्या प्रवासात सध्या 'क्रांतीज्योती विद्यालय' हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या १ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने यशाचा तिसरा आठवडा गाठला असून, यानिमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि प्रमुख भूमिकेतील अभिनेते सिद्धार्थ चांदेकर व अमेय वाघ यांनी रत्नागिरीतील 'सिटीप्राइड' चित्रपटगृहाला भेट दिली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत हेमंत ढोमे बोलत होते.
त्यांनी चित्रपट निर्मितीमागची भूमिका आणि मराठी शाळांच्या सद्यःस्थितीवर सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले की, केवळ मुंबई-पुण्यापुरते चित्रपटाचे प्रमोशन मर्यादित न ठेवता आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहोत. कोल्हापूर, संभाजीनगर, जळगाव अशा भागांनंतर आता आम्ही कोकण दौऱ्यावर आहोत. अलिबागच्या नागावमधील मराठी शाळेत या चित्रपटाचे चित्रीकरण झाले असल्याने कोकणातील निसर्ग आणि तिथली संस्कृती प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. विशेषतः अमेय वाघने साकारलेले 'आगरी' पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, पेणमध्ये या पात्राचे जंगी स्वागत झाले.
श्री. ढोमे यांनी सांगितले की, अनेक शाळांमध्ये दहावीपर्यंत केवळ दोन ते तीन शिक्षक उरले आहेत. राजगडच्या पायथ्याशी असलेल्या भोरमधील एका शाळेत फक्त एकच विद्यार्थी आहे, तरीही तो शिक्षक आपली शाळा टिकवण्यासाठी धडपडत आहे. चित्रपटाचा परिणाम समाजावर होत असल्याचे सांगताना त्यांनी काही सुखद अनुभवही मांडले. अनेक पालकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून काढून पुन्हा मराठी शाळेत घालण्याचा निर्णय घेतला आहे, तर काही महिलांनी हा चित्रपट म्हणजे 'मराठी संस्कृतीवरील संस्कार' असल्याची प्रतिक्रिया दिली.
शिक्षण क्षेत्राचे वाढते व्यापारीकरण आणि भाषेचे अस्तित्व यावर बोलताना श्री. ढोमे म्हणाले की, मराठी शाळा वाचवणे हे केवळ एका पक्षाचे किंवा सरकारचे काम नसून संपूर्ण महाराष्ट्रधर्माचे कर्तव्य आहे. पुढच्या १५-२० वर्षांत मराठी लिहिणारी आणि बोलणारी पिढी उरेल का, असा प्रश्न आहे. या चित्रपटातून मोठी क्रांती होईल असा दावा न करता, किमान या विषयावर समाजात गांभीर्याने चर्चा सुरू व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुढच्या आठवड्यात चित्रपटाची टीम विदर्भाचा दौरा करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी