
रत्नागिरी, 18 जानेवारी, (हिं. स.) : चिपळूण एसटी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी अतिरिक्त निधी मंजूर करणे तसेच चिपळूण शिवाजीनगर बसस्थानक पुनर्बांधणी व चालक–वाहक विश्रांतीगृहाच्या नूतनीकरणासाठी ७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
ही दोन्ही कामे गेली अनेक वर्षे रखडली होती. अपुऱ्या सुविधा, मोडकळीस आलेली बांधकामे आणि अस्वच्छतेमुळे दररोज हजारो प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. चालक व वाहकांसाठीही विश्रांतीसाठी आवश्यक सुविधा नसल्याने त्यांच्यात नाराजी होती. ही परिस्थिती बदलणे अत्यंत गरजेचे होते. ही गैरसोय आमदार शेखर निकम यांनी गांभीर्याने घेतली.
लोकांच्या भावनांची जाण ठेवत आमदार शेखर निकम यांनी शासन स्तरावर सातत्याने आणि ठामपणे पाठपुरावा केला. प्रवाशांची गैरसोय, चिपळूण शहराची वाढती गरज आणि भविष्यातील दळणवळणाची आवश्यकता शासनाच्या निदर्शनास आणून देत त्यांनी हा प्रश्न प्राधान्याने मांडला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत, या दोन्ही महत्त्वाच्या कामांसाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
हा निधी मंजूर झाल्याबद्दल श्री. निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे, तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विशेष आभार मानले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी