
नवी दिल्ली, 19 जानेवारी (हिं.स.) : भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडी प्रक्रियेला आज, सोमवारी अधिकृत सुरुवात झाली. पक्षाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज आपले नामांकन पत्र दाखल केले. दिल्लीतील भाजप मुख्यालयात ही औपचारिक प्रक्रिया पार पडली.
या निवड प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेले निवडणूक निर्णय अधिकारी पक्ष नेते के. लक्ष्मण यांच्याकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नितीन नवीन यांच्या समर्थनार्थ नामांकन पत्रांचा संच सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नितीन नवीन यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली आहे.नामांकन दाखल करताना भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, किरेन रिजिजू यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. याशिवाय अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पुष्कर सिंह धामी, नायब सिंह सैनी, प्रमोद सावंत तसेच बिहार, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, आसाम, झारखंड आदी राज्यांतील नेत्यांनीही नितीन नवीन यांच्या समर्थनार्थ नामांकन पत्रे सादर केली.
नामांकन प्रक्रिया दुपारी 2 ते 4 या वेळेत पार पडली. त्यानंतर नामांकन पत्रांची छाननी करण्यात आली. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे. आवश्यकता भासल्यास मंगळवारी 20 जानेवारी रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. पक्ष सूत्रांच्या माहितीनुसार, नितीन नवीन यांची भाजपच्या बाराव्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता आहे. ते मंगळवारी सकाळी 11.30 वाजता औपचारिकपणे अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, जे. पी. नड्डा, नितीन गडकरी, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
बिहारमधील अनुभवी नेते म्हणून ओळखले जाणारे नितीन नवीन हे पक्षाचे मजबूत संघटक मानले जातात. ते बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २००६ मध्ये त्यांनी पाटणा पश्चिम विधानसभा मतदारसंघातून प्रथमच बिहार विधानसभेत प्रवेश केला होता. डिसेंबर २०२५ मध्ये त्यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता ते पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी