
२०२६ चा टी-२० विश्वचषक भारतात खेळवायचा की, नाही याचा निर्णय घेण्यासाठी आयसीसीची बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (बीसीबी) २१ जानेवारीपर्यंत अंतिम मुदत
नवी दिल्ली, 19 जानेवारी (हिं.स.)भारत आणि श्रीलंकेत संयुक्तपणे आयोजित होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषकात बांगलादेशच्या सहभागाबाबत आणि विशेषतः त्यांच्या भारत दौऱ्याबाबत अंतिम निर्णय २१ जानेवारी रोजी घेतला जाणार आहे. ढाका येथे बांगलादेश आणि आयसीसी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. आयपीएल २०२६ पूर्वी मुस्तफिजूर रहमानला रिलीज करण्याच्या कोलकाता नाईट रायडर्सच्या निर्णयामुळे हा वाद निर्माण झाला. बीसीसीआयच्या सूचनेनुसार केकेआर फ्रँचायझीने हा निर्णय घेतला. त्यानंतर, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने क्रिकेटपटूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव टी-२० विश्वचषक सामने भारताबाहेर आयोजित करण्याची मागणी केली.
ढाका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत बांगलादेश क्रिकेट बोर्डाला सांगण्यात आले की, टी-२० विश्वचषकात सहभागी होण्याबाबत अंतिम निर्णय २१ जानेवारी रोजी घेतला जाईल. शनिवारी झालेल्या बैठकीनंतरही, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सामने भारतातून हलवण्याची मागणी पुन्हा केली. बांगलादेशच्या मागणीनंतर, आयसीसी आणि बीसीबीमध्ये चर्चा सुरू आहे. बोर्ड आणि आयसीसी अधिकाऱ्यांची आठवड्यात दुसऱ्यांदा बैठक झाली. बांगलादेश भारतात आपले सामने न खेळण्यावर ठाम आहे. बांगलादेश ग्रुप सी मध्ये आहे. बांगलादेशचा पहिला सामना वेस्ट इंडिज विरुद्ध कोलकाता येथे होणार आहे,. त्यांचे पुढील दोन सामने देखील तिथेच खेळवले जातील आणि त्यानंतर त्यांचा शेवटचा साखळी सामना मुंबईत होणार आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने देखील त्यांचा ग्रुप बदलण्याचा सल्ला दिला, जो आयसीसीने मान्य केला नाही. बीसीबीने गटात आयर्लंडऐवजी त्याला स्थान देण्याचा सल्ला दिला. आयर्लंड त्यांचे ग्रुप सामने श्रीलंकेत खेळेल. आयसीसीने बीसीबीला आश्वासन दिले आहे की, बांगलादेशला सुरक्षेचा कोणाताही धोका नाही. २० सहभागी संघांना पाठवलेल्या स्वतंत्र सुरक्षा एजन्सीने तयार केलेल्या सल्लागारात भारतातील कोणत्याही संघाला थेट किंवा विशिष्ट धोक्याचा उल्लेख नाही. आयसीसी बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अंतिम निर्णयाची वाट पाहत आहे. जर बीसीबीने बांगलादेशला भारतात प्रवास करण्यास परवानगी देण्यास नकार दिला तर आयसीसी कदाचित पर्यायी संघाची नावे देऊ शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे