
नवी दिल्ली, 19 जानेवारी (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) ने आर्थिक वर्ष 2025-26 साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवून 7.3 टक्के केला आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये हा अंदाज 6.6 टक्के होता. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवालात आयएमएफने म्हटले आहे की, भारताची आर्थिक कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली राहिली असून विशेषतः तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेने मजबूत गती दाखवली आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षाच्या वाढीच्या आकडेवारीत सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.
आयएमएफने पुढील आर्थिक वर्षासाठीही आशावादी चित्र मांडले आहे. 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्ष 2026-27 साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 6.2 टक्क्यांवरून वाढवून 6.4 टक्के करण्यात आला आहे. मात्र, 2027-28 पर्यंत वाढीचा दर पुन्हा 6.4 टक्क्यांच्या आसपास स्थिर होईल, कारण सध्या परिणाम दाखवणारे काही तात्पुरते घटक तेव्हापर्यंत कमी होतील, असे आयएमएफने नमूद केले आहे.
सरकारी आकडेवारीतही भारतीय अर्थव्यवस्थेची मजबुती स्पष्टपणे दिसून येत आहे. सांख्यिकी मंत्रालयाच्या ‘फर्स्ट ॲडव्हान्स एस्टिमेट’नुसार चालू आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था 7.4 टक्क्यांनी वाढू शकते, तर मागील आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ही वाढ 6.5 टक्के होती. जुलै-सप्टेंबर 2025 च्या तिमाहीत विकास दर 8.2 टक्के नोंदवला गेला असून एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्या सहामाहीत सरासरी वाढ 8 टक्के राहिली आहे. यावरून उत्पादन आणि सेवा क्षेत्रात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसते.
महागाईबाबतही आयएमएफने सकारात्मक संकेत दिले आहेत. अहवालानुसार 2025 मध्ये खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे महागाईचा दर नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे. भारतात रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाईसाठी 4 टक्क्यांचे लक्ष्य निश्चित केले असून त्यात 2 टक्के वर किंवा खाली जाण्याची मुभा आहे. आयएमएफचा अंदाज आहे की येत्या काळात महागाई दर या लक्षित मर्यादेतच राहील.
उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांमध्ये सरासरी वाढ 4 टक्क्यांच्या वर राहील, असेही आयएमएफने स्पष्ट केले आहे. यामध्ये भारत ही सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरली असून ही वाढ प्रामुख्याने देशांतर्गत मागणी आणि सरकारी खर्चातील वाढीमुळे होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule