
मुंबई , 19 जानेवारी (हिं.स.)।आज सोमवार, 19 जानेवारीपासून नव्या आठवड्याची सुरुवात झाली आहे. या आठवड्यात अनेक नवे चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून त्यामध्ये ‘बॉर्डर 2’ची सर्वाधिक चर्चा आहे. मात्र, ओटीटीवरही प्रेक्षकांसाठी बरेच खास कंटेंट येणार आहे. ‘गुस्ताख इश्क’, ‘तेरे इश्क में’ असे अनेक मनोरंजक चित्रपट आणि वेबसीरिज या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत.
विजय वर्मा आणि फातिमा सना शेख यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ‘गुस्ताख इश्क’ 28 नोव्हेंबर 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘गुस्ताख इश्क’ 23 जानेवारी 2026 पासून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विभू पुरी यांनी केले असून, यात नसीरुद्दीन शाह आणि शारिब हाशमी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
कृती सेनन आणि धनुष यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ‘तेरे इश्क में’ मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल. राय यांनी केले आहे. आता या आठवड्यात हा चित्रपट ओटीटीवर येत आहे. ‘तेरे इश्क में’ 23 जानेवारी 2026 पासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल. या चित्रपटात प्रकाश राज, प्रियांशु पैन्यूली आणि तोता रॉय चौधरी हे कलाकारही झळकणार आहेत.
कन्नड चित्रपट ‘मार्क’ देखील चित्रपटगृहांनंतर आता ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट 25 डिसेंबर 2025 रोजी रिलीज झाला होता आणि आता तो 23 जानेवारी 2026 पासून जिओ हॉटस्टारवर उपलब्ध होणार आहे. या चित्रपटात किच्चा सुदीप मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत शाइन टॉम चाको, नवीन चंद्र, विक्रांत आणि योगी बाबू हे कलाकारही दिसणार आहेत.
याशिवाय एक स्पेस सायन्स ड्रामा वेबसीरिजही या आठवड्यातील ओटीटी यादीत समाविष्ट आहे. ही सीरिज 23 जानेवारी 2026 पासून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. या सीरिजचे क्रिएटर अरुणाभ कुमार असून, यात श्रिया सरन, गोपाल दत्त, नकुल मेहता, प्रकाश बेलावाडी आणि दानिश सैत यांसारखे कलाकार आहेत.
याशिवाय तमिळ क्राईम कोर्टरूम ड्रामा चित्रपट ‘सिराई’ देखील या आठवड्यात ओटीटीवर येत असून तो 23 जानेवारीपासून झी5 वर स्ट्रीम होणार आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन ड्रामा वेबसीरिज ‘इट्स नॉट लाइक दॅट’ चीही जोरदार चर्चा असून, ही सीरिज 25 जानेवारीपासून प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode