जळगाव, सोन्या-चांदीचे भाव उसळले, चांदीने मोडला विक्रम
जळगाव, 19 जानेवारी (हिं.स.) देशात सोन्या-चांदीच्या दरांनी आज ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. दर कमी होण्याच्या अपेक्षेत असलेल्या ग्राहकांना मोठा धक्का बसला असून, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये जोरदार उसळी पाहायला म
प्रतिकात्मक लोगो


जळगाव, 19 जानेवारी (हिं.स.) देशात सोन्या-चांदीच्या दरांनी आज ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. दर कमी होण्याच्या अपेक्षेत असलेल्या ग्राहकांना मोठा धक्का बसला असून, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये जोरदार उसळी पाहायला मिळाली. सोन्याचा दर थेट १ लाख ४५ हजार रुपयांपर्यंत पोहोचला असून, चांदीने तर इतिहास रचत १ किलोमागे ३ लाख रुपयांचा टप्पा पहिल्यांदाच पार केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेला राजकीय तणाव, तसेच जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा १,९१० रुपयांची वाढ होऊन दर १,४५,६९० रुपये झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,७५० रुपयांनी वाढून १,३३,५५० रुपये झाला आहे. चांदीच्या दरवाढीचा वेग थांबण्याचे नाव घेत नाही. आज एका किलोमागे तब्बल १०,००० रुपयांची वाढ नोंदवली गेली असून, चांदीचा दर ३,०५,००० रुपयांवर पोहोचला आहे. चांदीने इतिहासात प्रथमच तीन लाखांचा टप्पा ओलांडल्याने बाजारात खळबळ उडाली आहे. अमेरिकेने युरोपियन देशांवर नवीन शुल्क लागू केल्याने जागतिक तणाव अधिकच वाढला आहे. याशिवाय माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्या ग्रीनलँड संदर्भातील धोरणांमुळेही आंतरराष्ट्रीय राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्या-चांदीकडे मोर्चा वळवला असून, त्यामुळे दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारातही सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात सुमारे २,००० रुपयांची, तर चांदीच्या दरात १०,००० रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. जीएसटीसह सोन्याचा दर १ लाख ४८ हजार रुपयांपर्यंत पोहोचला असून, चांदीचा दर जीएसटीसह ३ लाख ३ हजार ८५० रुपये इतका झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande