
नाशिक, 19 जानेवारी (हिं.स.) नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा आंतरराष्ट्रीय युवा क्रिकेटपटू ,आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख याची २३ वर्षांखालील सी के नायडू ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. एलिट गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राचे साखळी सामने २३ जानेवारी ते १६ फेब्रुवारी दरम्यान चार दिवसीय कसोटी स्वरूपात विविध ठिकाणी होणार आहेत.
आगामी आय पी एल साठी ३० लाख या रकमेच्या बेस प्राइस -कमीतकमी बोली किंमत वर दिल्ली कॅपिटलने साहिल पारखला आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले आहे. साहिलने नुकतेच सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेत वरिष्ठ महाराष्ट्र संघात पदार्पण केले होते.
१९ वर्षांखालील वयोगटासाठीच्या विनू मंकड स्पर्धेत साहिल महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. नाशिकचा खेळाडू भारतीय संघात असावा हे सर्व नाशिककरांचे स्वप्न साकार करत सप्टेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारखने १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतांना ,आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करत, केवळ ७५ चेंडूत १४ चौकार व तब्बल ५ षटकारांसह नाबाद १०९ धावा फटकावत, भारतीय संघाला केवळ २२ षटकांतच ९ गडी राखून जोरदार विजय मिळवून दिला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV