
रत्नागिरी, 19 जानेवारी, (हिं. स.) : रत्नागिरी शहरात रविवारी (दि. १८ जानेवारी) संध्याकाळी एक अत्यंत भीषण अपघातात प्रसिद्ध ‘सहेली ब्युटी पार्लर’च्या संचालिका सौ. सुनीता राजेश साळवी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गजबजलेल्या लाला कॉम्प्लेक्स येथील रस्त्यावर हा अपघात झाला. सौ. सुनीता साळवी या रस्त्यावर पडल्या असताना, राजिवडा येथील एका तरुणाने आपली भरधाव होंडा सिटी कार त्यांच्या अंगावरून नेली. या अपघातानंतर संबंधित कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता.या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात संबंधित तरुणावर हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साळवी गेल्या ३० वर्षांपासून रत्नागिरीत ब्युटी पार्लर व्यवसायात होत्या. त्या रत्नागिरीतील पहिल्या ब्युटी पार्लर व्यावसायिक म्हणून ओळखल्या जात. शहरात त्यांची दोन पार्लर असून त्यांनी आपल्या कष्टाने हा व्यवसाय नावारूपाला आणला होता. अत्यंत नम्र, मितभाषी आणि सर्वांशी मिळून-मिसळून वागणाऱ्या सुनीता साळवी यांच्या मृत्यूने मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातू आणि मुलगी असा परिवार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी