
जळगाव, 02 जानेवारी (हिं.स.) यावल-किनगाव दरम्यानच्या चुंचाळे फाट्याजवळ २४ लाख रुपयांची जबरी चोरी झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. जळगाव येथील तीन, चोपडा व धुळे येथील प्रत्येकी एक अशा पाच जणांच्या टोळीने ही लूट केली. पैकी तिघांना पोलिसांनी अटक असून लुटीतील १३ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.२८ डिसेंबरला दुपारी भुसावळ येथील किराणा मालाचे व्यापारी राजू पारेख यांच्याकडील वसुली कर्मचारी किरण प्रभाकर पाटील (वय ५०, रा. राम मंदिर वॉर्ड, भुसावळ) हे दुचाकीने (एमएच.१९ डीडब्ल्यू. ०५४७) चोपड्याकडून यावल मार्गे भुसावळला येत असताना चुंचाळे फाट्याजवळ मागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांचा रस्ता अडवला. आणि चाकूचा धाक दाखवून किरण पाटील यांच्याकडील वसुलीची २४ लाखांची रोकड असलेली पिशवी हिसकावून पलायन केले होते.यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एलसीबीला समांतर तपासाचे आदेश दिले. या मोहिमेसाठी एलसीबीने चार विशेष पथके तयार केली होती. तपास पथकाने घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांचे जाळे विणले. अखेर, पोहेकॉ. विलेश सोनवणे यांना मिळालेल्या ठोस माहितीनुसार, हा गुन्हा चोपडा व जळगावमधील पाच जणांच्या टोळीने केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तीन जणांना जेरबंद केले. जुबेर खान हमीद खान (क्य ३३, रा. चोपडा), शोएब शेख इस्माईल शेख (क्य २५) आणि इस्माईल खान शेर खान (क्य २५, दोन्ही रा.हुडको, जळगाव) अशा त्यांची नावे आहेत. त्यांच्या वाटेला आलेली १३ लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. तिघांना गुरुवारी यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्यायाधीश आर. एस. जगताप यांच्यासमोर हजर करण्यात आले. सुनावणीअंती त्यांना ७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. तपास एपीआय अजयकुमार वाढवे, हवालदार वासुदेव मराठे, सागर कोळी करत आहेत. दरम्यान या या गुन्ह्याचा मुख्यसूत्रधार साहिल सत्तार शहा (रा. धुळे) आणि अनस शहा हे दोघे फरार आहेत. साहिल शहा हा धुळ्यातील आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर घरफोडी, अंमली पदार्थ विक्री, वाहन चोरी आणि मंदिर चोरी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस पथके सध्या धुळे व परिसरात या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर