
जळगाव, 2 जानेवारी, (हिं.स.) - जोशीपेठेतील सराफा व्यावसायिकाकडे कामाला असलेल्या दोन बंगाली कारागीर सुमारे ३१ लाख ६९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकी आली आहे. सुवर्ण व्यावसायिक टोटन बलराम बाहेती (वय ५१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. असित गंगाबाला मन्ना व तापस रूपचंद मन्ना (दोन्ही रा. बंशकल पश्चिम मेदिनापूर, पश्चिम बंगाल) असं फरार कारागिरांचे नाव आहे.
तक्रारदार बाहेती हे गेल्या ३० वर्षांपासून सोन्याचे दागिने बनवण्याचा व्यवसाय करतात. त्यांची ओळख चार ते पाच वर्षांपासून तापस रूपचंद मन्ना याच्याशी होती. त्याच ओळखीतून तापस मन्ना याने त्याचा चुलत भाऊ असित गाबाला मन्ना (रा. बंशकल, पश्चिम बंगाल) हा विश्वासू व प्रामाणिक कारागीर असल्याची शिफारस बाहेती यांच्याकडे केली होती.तापस मन्ना याच्या शब्दावर विश्वास ठेवून बाहेती यांनीही असित मन्ना याला आपल्या दुकानात कारागीर म्हणून कामावर ठेवून घेतले. गेल्या तीन ते चार वर्षांच्या कालावधीत असितने मेहनतीने काम करत मालकाचा पूर्ण विश्वास संपादन केला होता. मात्र, याच विश्वासाचा गैरफायदा घेत तो ३० लाखांपेक्षा अधिक किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन फरार झाल्याचे उघडकीस आले आहे.टोटन यांनी २० कॅरेटचे २९७,१०० ग्रॅम सोने मंगलपोत बनवण्यासाठी दिले होते. हे सोने घेऊन ते पसार झाले. दोघे कामावर येत नसल्याने टोटन यांनी तक्रार दिल्यावरून त्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर